महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबाद याठिकाणी सभा पार पडली. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवरून भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी पुन्हा एकदा आमचं हिंदुत्व हे गधाधारी नसून गदाधारी असल्याचं म्हटलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही मुस्लिमांचा द्वेष केला नाही. प्रत्येकानं आपला धर्म आपल्या घरात ठेवावा, घरातून बाहेर पडल्यानंतर भारतीय हाच आपला धर्म असेल, असंही ते म्हणाले.
औरंगाबाद येथे पार पडलेल्या जाहीर सभेतून बोलताना त्यांनी औरंगजेब नावाच्या भारतीय लष्करातील जवानाचा प्रसंग सांगितला. देशासाठी शहीद होणारा भारतीय लष्कराचा जवान औरंगजेब हाही आमचाच आहे. देशासाठी प्राण देणारा प्रत्येक मुसलमान आमचाच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
संबंधित प्रसंग सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या जम्मू-काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांच्या हत्या होत आहेत. असाच एक भारतीय जवान सुट्टीसाठी आपल्या घरी चालला होता. दरम्यान वाटेतच त्याचं अपहरण करण्यात आलं. काही दिवसांनी त्याचा मृतदेह छिन्नविछिन्न केलेल्या अवस्थेत आढळला. तो भारतीय जवान धर्माने मुस्लीम होता आणि त्याचं नाव औरंगजेब होतं. देशासाठी शहीद होणारा हा औरंगजेब आमचाच आहे. देशासाठी प्राण देणारा प्रत्येक मुसलमान आमचाच आहे, असं त्यांनी म्हटलं.
काश्मीरमध्ये काश्मीरी पंडित भयभीत होऊन घरं सोडत आहेत, पण भाजपात एकही ‘माय का लाल’ नाही जो यावर बोलेल. इथं येऊन बांगलादेशी राहत असतील, तर माझ्याच देशातील काश्मिरी पंडितांना का राहता येत नाही, असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी आजच्या भाषणातून विविध मुद्द्यांवरून भाजपाला लक्ष्य केलं. औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरून जलआक्रोश मोर्चा काढणाऱ्या भाजपाने मागील पाच वर्षात सत्तेत असताना काय केलं? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.