भगवान गौतम बुद्धाने मांडलेला विश्व पुनर्रचनेच्या सिद्धांताचे गतिशास्त्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विकसित केले. माणसाच्या सदसद्विवेक बुद्धीला पटेल हाच विचार जगाच्या कल्याणाचा असतो, हे मांडणारे बाबासाहेब खऱ्या अर्थाने विश्वमानव आहेत, असे प्रतिपादन आंबेडकरी विचारधारेतील ज्येष्ठ विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २२ वा नामविस्तार दिन गुरुवारी विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात येत आहे. या निमित्त प्रख्यात विचारवंत, ज्येष्ठ कवी, विचारवंत डॉ. मनोहर यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वपुनर्रचनेचा सिद्धांत’ या विषयावर व्याख्यान झाले. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी अध्यक्षस्थान भूषविले.
डॉ. मनोहर म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाणदिन १९५६मध्ये झाले. तथापि याच दिवशी विश्व मानवाच्या विचारांचा जन्म झाला, असे मी मानतो. अंधारलेल्या विश्वाला आपल्या उजेडाने व्यापून टाकणाऱ्या या प्रज्ञासूर्याचे आपण पुत्र आहोत, विचारांचे वारसदार आहोत याचा अभिमान असला पाहिजे. बाबासाहेब हे अथांगाचे अथांग आहेत. महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेबांची उंची आणि खोली वाढते आहे. त्यामुळे बाबासाहेबांना मानणाऱ्या प्रत्येकाने आता विचारांची उंची, बौद्धिक क्षमता वाढविण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी विश्वाचे कल्याण हाच विचार आयुष्यभर केला आणि कार्यही केले. समाधानी राहण्याचा ‘गुन्हा’ करूनका, हा डॉ. आंबेडकर यांचा विचार मला पटला, मी आयुष्यभर जतन केला. बाबासाहेब जन्मले नसते तर माझ्यासारखे हजारो लोक उपेक्षेच्या अंधारात वाहून गेले असते.
आजच्या सामाजिक वास्तवाबद्दल डॉ. मनोहर म्हणाले की, आजची प्रस्थापित व्यवस्था केवळ माणसानांच मारते आहे असे नाही, तर माणसांची मनेदेखील मारून टाकली जात आहेत. तरीही या निष्पाप लोकांना हे कळत नाही. त्यामुळे बाबासाहेबांच्या अनुयायांवरची जबाबदारी वाढली. कार्ल माक्ऱ्र्स यांच्या सार्वभौम लोकशाही-समाजवाद या तत्त्वात हिंसा व हुकूमशाहीचा समावेश असल्याने हे तत्त्व जगात पराभूत होत आहे. तथापि बाबासाहेबांनी िहसाविरहीत, हुकूमशाहीविरहीत मांडलेला लोकशाही समाजवाद जगभर सक्षमपणे नेला पाहिजे. दुनियेत वाढलेली दुष्टता कमी करण्यासाठी बाबासाहेबांच्या विचारांची अथांगता आपण जाणावी, हीच खरी आंबेडकरी विचारांची खुणगाठ आहे, असेही ते म्हणाले.
या वेळी डॉ. मनोहर यांनी लोकाग्रहास्तव ‘जपून रे माझ्या फिनिक्स पक्षांनो जपून’ ही कविता सादर केली. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव सिद्धार्थ खरात, कुलसचिव डॉ. महेंद्र सिरसाठ, बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे यांच्यासह डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. सय्यद अझरुद्दीन, डॉ. सुहास मोराळे, डॉ. उत्तम अंभोरे यांची उपस्थिती होती.
बाबासाहेबांचे नाव अजरामर राहील : सिद्धार्थ खरात
डॉ. आंबेडकर हे विसाव्या शतकाला पडलेले स्वप्न होते. अडीच हजार वर्षांच्या गुलामगिरी, रुढी-परंपरेच्या इतिहासाला बाबासाहेबांनी १९२० ते १९५६ या ३६ वर्षांच्या काळात कलाटणी दिली. अशा प्रकारे देशाचा हा चमकता तारा, बाबासाहेबांचे नाव अजरामर राहील, असे प्रतिपादन उपसचिव सिद्धार्थ खरात यांनी केले. शिक्षणाच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक कार्यात संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या आंबेडकरी विचारांच्या लोकांनी शिक्षणाचे ‘पेटंट’ नावाचे करून घ्यावे. नामांतराच्या चळवळीचे धगधगते अग्निकुंड विझू न देता समाजातील नीतिमूल्यांची जोपासना, बाबासाहेबांचे विचार कृतीतून पुढे न्यावेत, असे आवाहनही खरात यांनी केले. अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. चोपडे यांनी, बाबासाहेबांच्या विचारांचे गारुड हजारो वष्रे माणसांच्या मनावर अधिराज्य करीत राहील, असे म्हटले. १४ जानेवारी १९९४ ते आजतागायत २१ वर्षांत झालेल्या प्रगतीचा आढावा कुलसचिव डॉ. महेंद्र सिरसाठ यांनी प्रास्ताविकात घेतला. डॉ. उत्तम अंभोरे यांनी सूत्रसंचालन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा