देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी निजामाच्या जोखडाखाली अडकलेल्या हैदराबाद संस्थानातील लढय़ाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे नतिक पाठबळ मिळाले होते. त्यातूनच मराठवाडय़ात स्वातंत्र्याची पहाट झाली, असे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी अॅड. भगवानराव देशपांडे यांनी सांगितले. धर्मसत्ता व राजसत्ता कधीच एकत्र नांदू शकत नाहीत, या शब्दांत बाबासाहेबांनी निजामाच्या धार्मिक सत्तेला विरोध केला होता, असेही ते म्हणाले.
हैदराबाद मुक्तिसंग्रामदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम व डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर अॅड. देशपांडे यांचे व्याख्यान झाले. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ स्वातंत्र्यसनिक किशनराव राजूरकर (परभणी), जीवनधर शहरकर (लातूर) व मुरगप्पा खुमसे (रेणापूर) यांचा सत्कार करण्यात आला. उदार कला संकुलाचे संचालक डॉ. वि. ल. धारूरकर यांची उपस्थिती होती.
अॅड. देशपांडे म्हणाले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘बहिष्कृत भारत’मधून दलित, वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यास प्रयत्न केले, तसेच राजकीय स्वातंत्र्याशिवाय समाजाची प्रगती होऊ शकत नाही, हे ठासून सांगितले. समता, स्वातंत्र्य व बंधुता ही नीतिमूल्ये अंगीकारल्याशिवाय स्वातंत्र्याची पहाट उजाडणार नाही. हैदराबाद संस्थानात भाषण, लेखन, शिक्षण व सभा स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत नागरी स्वातंत्र्य येणार नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगितले होते. शेडय़ूल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून हैदराबाद संस्थानमध्येही दलितांना स्वातंत्र्याचा विचार बाबासाहेबांनी दिला होता, असेही ते म्हणाले.
डॉ. वि. ल. धारूरकर ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम : एक तेजस्वी पर्व’ या विषयावर व्याख्यान देताना म्हणाले, की हैदराबाद संस्थानमध्ये सुरूझालेला संघर्ष ग्रामीण, शहरी, महिला, पुरुष, दलित, अल्पसंख्याक असा सर्व स्तरांतून उभा राहिल्याने खऱ्या अर्थाने तो लोकलढा होता. मोगलांच्या अत्याचाराविरोधात तब्बल ७०० वष्रे मराठवाडा संघर्ष करीत होता. हा सर्व इतिहास विद्यापीठातर्फे पुस्तकरूपात मांडण्यात येणार आहे.
‘मुक्तिसंग्रामावर राष्ट्रीय परिषद घेणार’
हैदराबाद मुक्तिसंग्रामावर या शैक्षणिक वर्षांत राष्ट्रीय परिषद घेण्याचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी जाहीर केले. मराठवाडा, आंध प्रदेश व कर्नाटक या तिन्ही ठिकाणचे स्वातंत्र्यसनिक, इतिहास संशोधकांना आमंत्रित करण्यात येईल, असेही ते म्हणाले. स्वातंत्र्यसनिक जीवनधर शहरकर व मुरगप्पा खुमसे यांनी मुक्तिसंग्रामातील आठवणींना उजाळा दिला. इंग्रज, मोगलांविरुद्ध लढून मिळविलेल्या स्वातंत्र्यात शेतकरी आत्महत्या होत असतील तर पुन्हा संघर्ष उभारावा लागेल, असेही ते म्हणाले. किशनराव राजूरकर यांनी दुष्काळग्रस्त निधीसाठी पाच हजारांची रक्कम कुलगुरूंकडे सुपूर्द केली. अॅड. भगवानराव देशपांडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा