चिटफंड घोटाळाप्रकरणी उस्मानाबाद पोलिसांच्या अटकेत असलेल्या महेश मोतेवारच्या खासगी सुरक्षारक्षकाने पत्रकारांना धक्काबुक्की केली. जिल्हा शासकीय रुग्णालयातून मोतेवारला सोलापूर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना गुरुवारी सकाळी हा प्रकार घडला. या प्रकरणी पत्रकार महेश पोतदार आणि संतोष जाधव यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी खासगी सुरक्षारक्षक शहानूर काझी (रा. बिबेवाडी, पुणे) याला अटक केली आहे. दरम्यान महेश मोतेवार याच्यावर नेमके काय उपचार केले, याची माहिती देण्यासाठी कागदपत्रांसह हजर राहण्याचे समन्स स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने जिल्हा न्यायालयाला बजावण्यात आला आहे.
महाराष्ट्रासह ओरिसा, मध्य प्रदेश पोलिसांना विविध गुन्ह्यांत हवा असलेला मोतेवार मागील तीन दिवसांपासून उस्मानाबाद पोलिसांच्या कोठडीत आहे. बुधवारी रात्री पोटात दुखत असल्याचे सांगून उस्मानाबाद येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाला. रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, सकाळी अचानक त्याला पुढील उपचारासाठी सोलापूरला पाठविण्याचा निर्णय जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांनी घेतला. याच वेळी माध्यमांचे प्रतिनिधी याचे वार्ताकन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आले असता, वार्ताकन आणि चित्रीकरण करण्यास मज्जाव करीत महेश मोतेवार याचा खासगी सुरक्षारक्षक शहानूर काझी याने पत्रकार महेश पोतदार आणि संतोष जाधव यांना धक्काबुक्की केली. या वेळी उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. त्यांच्यासमोर हा सर्व प्रकार घडला. धक्काबुक्की केल्यानंतर आपल्या चारचाकी वाहनातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या काझीला पत्रकारांनीच पोलिसांच्या हवाली केले. शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून सध्या तो अटकेत आहे. उमरगा न्यायालयात मोतेवार यास घेऊन जात असतानाही याच सुरक्षारक्षकाने पत्रकारांना मज्जाव केला असल्याचे समोर येत आहे.
अचानक सोलापूर येथे उपचारासाठी पाठविण्याची काय गरज पडली, अशी विचारणा डॉ. धनंजय पाटील यांना केली असता, महेश मोतेवार यांना हृदयरोग असल्याचे त्यांनी सांगितले. आठ ते दहा तास निगराणीखाली ठेवून देखील त्यांचा त्रास कमी न झाल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना सोलापूरला पाठविले असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोतेवार याला दिलेली ही विशेष वागणूक उस्मानाबाद पोलिसांनी अचूक हेरली आहे. मोतेवारवर नेमके काय उपचार केले, याची माहिती देण्यासाठी कागदपत्रांसह हजर राहा, अशी नोटीस फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ९१ अनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्णालयाला बजावण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा