Sandeep Kshirsagar vs Jaydutt Kshirsagar in Beed Vidhan Sabha Constituency: बीड विधानसभा मतदारसंघ हा बीड जिल्ह्याच्या ठिकाणचा महत्त्वाचा मतदारसंघ. बीड लोकसभेपासून ते जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात कोणाही एका नेत्याचे वर्चस्व दिसत नाही. जातीय गणिते, पक्षांतरे यामुळे विविध विधानसभा मतदारसंघातील गणिते नेहमी बदलत असतात. बीड विधानसभेत २००९ आणि २०१४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे (संयुक्त) माजी नेते जयदत्त क्षीरसागर यांनी विजय मिळविला होता. मात्र २०१९ सालच्या निवडणुकीला सहा महिने उरले असताना क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत शिवसेनेत प्रवेश केला आणि कॅबिनेट मंत्रीपद मिळविले. पण २०१९ च्या विधानसभेत मात्र त्यांना विजय मिळविता आला नाही. त्यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीच्याच तिकीटावर याठिकाणी विजय मिळविला.
यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा काका-पुतण्या समोर येण्याची चिन्ह असताना क्षीरसागर कुटुंबातील आणखी एक सदस्य विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात संदीप क्षीरसागर यांचे चुलत भाऊ डॉ. योगेश क्षीरसागर इच्छुक आहेत. संदीप क्षीरसागर हे शरद पवार गटात असल्यामुळे त्यांनाच पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचाच आमदार असल्यामुळे अजित पवार गटही येथे उमेदवार देण्यासाठी मोर्चेबांधणी करू शकतो. अजित पवार गटाचे नेते, जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यानांही जिल्ह्यात अजित पवार गटाचे आमदार निवडून आणण्याचे आव्हान असेल.
दुसरीकडे माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी अद्याप कोणतीही हालचाल केलेली दिसून आलेली नाही. २०१९ साली शिवसेनेत प्रवेश केला असला तरी निष्क्रिय असल्यामुळे २०२२ साली त्यांना पक्षातून बाजूला करण्यात आले होते. तेव्हापासून ते राजकीय आणि सामाजिक पटलावर दिसलेले नाहीत. मात्र विधानसभेच्या तोंडावर ते भाजपा किंवा अजित पवार गटाकडून तिकीट मिळविण्याचा प्रयत्न करू शकतात? असे सांगितले जाते.
राष्ट्रवादीबरोबरच शिवसेनेचाही या मतदारसंघावर एकेकाळी वरचष्मा राहिलेला आहे. १९९०, १९९५ असे सलग दोनवेळा शिवसेनेचे सुरेश नवले हे याठिकाणी आमदार होते. तर त्यानंतर १९९९ ते २००४ या टर्ममध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सय्यद सलीम सय्यद अली निवडून आले होते. त्यानंतर २००४ साली पुन्हा एकदा शिवसेनेचे सुनील धांडे निवडून आले होते. सुरेश नवले यांना १९९५ साली महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रीपदही मिळाले होते. यंदा सुरेश नवले हेदेखील शिवसेनेच्या एका गटाकडून तिकीट मागण्याच्या तयारीत आहेत. लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांनी सुरेश नवले मित्र मंडळाच्या नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांना जाहीर पाठिंबा देऊ केला होता.
जरांगे फॅक्टर चालणार का?
लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा परिणाम पाहायला मिळाला. जे बजरंग सोनवणे २०१९ साली लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्यासमोर पराभूत झाले होते, ते यंदा पंकजा मुंडे यांच्यासमोर विजयी झाले. तीन-तीन पक्ष एकत्र असूनही मुंडे यांना पराभव सहन करावा लागला. त्यामुळे येत्या विधानसभेलाही जरांगे फॅक्टर दिसणार का? याची उत्सुकता आहे.
हे ही वाचा >> Shirdi Assembly Constituency: शिर्डी विधानसभा: विखेंचा गड यंदा ढासळणार की शाबूत राहणार?
संदीप क्षीरसागर यांची सावध भूमिका
विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर हे तेली (ओबीसी) प्रतिनिधित्व करतात. मराठवाड्यात आरक्षण आंदोलनामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष दिसत असताना बीड विधानसभेतही मराठी विरुद्ध ओबीसी संघर्ष दिसेल का? हे निवडणूक जाहीर झाल्यानंतर दिसेल. मराठा आंदोलन जोरात सुरू असताना काही समाजकंटकांनी आमदार संदीप क्षीरसागर यांचे घर जाळण्याचा प्रयत्न केला होता. तरीही त्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी मराठा समाज आणि मनोज जरांगे यांच्याविरोधात एकही टीकेचा सूर लावून धरला नाही. मराठा समाजाच्या आडून दुसऱ्याच कुणीतरी हा हल्ला केला असावा? असा दावा त्यांनी केला आणि मराठा विरुद्ध ओबीसी असा संभाव्य वाद टाळण्याचा प्रयत्न केला.
क्षीरसागर कुटुंबाची एकहाती सत्ता उलथणार?
बीड विधानसभा मदारसंघात बीड शहराचा समावेश होतो. या शहरावर गेल्या २५ वर्षांपासून क्षीरसागर कुटुंबियांचे एकहाती नियंत्रण होते. नगरपालिका, जिल्हा परिषद, आमदारकी अशी सर्व काही पदे घरातच असताना भावा-भावांमधील संघर्ष पेटल्यामुळे क्षीरसागर कुटुंबिय आता विखुरले आहेत. बीड शहरात एकाच घरात हे सर्वजण राहत असले तरी त्यांच्या राजकीय वाटा आता वेगळ्या झाल्या आहेत. क्षीरसागर यांचे विरोधक या परिस्थितीचा फायदा घेऊन क्षीरसागर यांचे राजकीय वर्चस्व संपवितात का? हेही या निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटेंची भूमिका महत्त्वाची
शिवसंग्राम या संघटनेचे संस्थापक माजी आमदार विनायक मेटे यांचे लोकसभा निवडणुकीपूर्वी अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनी शिवसंग्रामतर्फे लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार केला होता. मात्र पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर त्यांनी निर्णय मागे घेतला. आता त्या बीड विधानसभेसाठी तयारी करत असून त्याही निवडणुकीच्या रिंगणात दिसण्याची शक्यता वर्तविली जाते. विनायक मेटे यांना माननारा एक वर्ग बीड जिल्ह्यात असल्यामुळे ज्योती मेटे मतांमध्ये याचे परिवर्तन करू शकतील का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरू शकते.
२०१९ विधासभेचा निकाल –
१. संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी काँग्रेस) – ९९,९३४
२. जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) – ९७,९५०
३. अॅड. शेख शफिक (एमआयएम) – ७९५७
४. अशोक हिंगे (वंचित) – ५५८५
बीड विधानसभेतील २०२४ चे उमेदवार कोण?
बीड विधानसभेत एकूण १३९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.. त्यापैकी १३ जणांचे अर्ज बाद झाले असून तीन जणांनी मुदतीआधीच अर्ज मागे घेतले आहेत. सध्या तरी १२३ जणांचे अर्ज पात्र असून ४ नोव्हेंबर पर्यंत यातले अनेक अर्ज मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. अनेकांनी प्रत्येकी दोन ते तीन अर्ज भरले आहेत. तर डमी अर्जही मोठ्या प्रमाणात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून योगेश क्षिरसागर, मनसेकडून सोमेश्वर कदम, तर बीडचे माजी आमदार आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा मुंडे यांनी स्वराज्य शक्ती सेना या पक्षातर्फेही अर्ज दाखल केला आहे. तसेच शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांनीही अपक्ष म्हणून आपला अर्ज भरला आहे.
ताजी अपडेट
बीड विधानसभेत क्षीरसागर कुटुंबातच तिरंगी लढत होण्याचा प्रसंग जयदत्त क्षीरसागर यांनी टाळला आहे. मोठे मन करून दोन पुतण्याच्या लढाईत काका जयदत्त क्षीरसागर यांनी माघार घेत आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता बीड विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) उमेदवार डॉ. योगेश भारतभूषण क्षीरसागर आणि महाआघाडीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर यांचा अवघ्या एक हजार आठशे मतांनी पराभव केला होता. यंदा काका जयदत्त क्षीरसागर यांनी दुसरे पुतणे डॉ. योगेश भारतभूषण क्षीरसागर यांच्या मागे शक्ती उभे करत असल्याचे स्पष्ट केले आहे.
मतदानाच्या दिवशी काय झाले?
बीड विधानसभा मतदारसंघात क्षीरसागर बांधवांमध्ये लढत होत आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बीड जिल्ह्यातील २२ लाख २७ हजार ८४४ मतदारांपैकी १५ लाख ३४ हजार ४३६ म्हणजेच ६८.८८ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच बीड विधानसभेत एकूण ६२.१८ टक्के मतदान झाले.