लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : करोना काळात प्राथमिक शाळांमधून जपानी भाषेचे शिक्षण देण्याची आरंभशूरता आता मोठ्या गळतीच्या पातळीवर येऊन थांबली आहे. परभणी व संभाजीनगर जिल्ह्यातील काही शाळांमध्ये सुरू असणाऱ्या या उपक्रमातून नोंदणी झालेल्या एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांपैकी केवळ पाच जणांना जपानी भाषेतील गुणवत्तेची पहिली परीक्षा उत्तीर्ण करता आली.
मूलत: जपानी भाषा शिकवणीचा अभ्यासक्रम वयाने मोठ्या असणाऱ्या मंडळींसाठी करण्यात आला होता. तोच अभ्यासक्रम लहान मुलांना लागू केल्यानेही काही चुका झाल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. एका बाजूला परदेशी भाषा शिक्षणातील सातत्यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले जात असतानाच छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनाने जपानी, जर्मनी भाषेचे धडे महापालिकांच्या शाळेतून ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गाडीवाट या शाळेतील शिक्षकांनी जपानी भाषा शिकविण्याचे ऑनलाइन वर्ग घेण्यास सुरुवात केली. या कामामध्ये शिक्षकांनी उत्साहात सहभाग नाेंदवला. करोनाच्या काळात सुरू झालेला हा वर्ग या शाळेत अजूनही सुरू आहे. मात्र, परभणी जिल्ह्यातील या उपक्रमास काहीशी गळती लागल्याचे शिक्षक मान्य करतात. आर. पी. कच्छवे म्हणाल्या, ‘करोना काळात सात शाळांमध्ये ४५० मुलांनी जपानी भाषा शिक्षणासाठी नोंदणी केली. पुण्यातील जपानी भाषा शिकवणाऱ्या मंडळींनी त्यांना सहकार्य केले. पुढे अधिकाऱ्याची बदली झाली आणि प्रयोग मागे पडला.’
मराठवाड्यातील काही प्राथमिक शाळांमध्ये ‘तोमोशिबी’ नावाचा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. तोमोबिशीचा अर्थ ज्योत पेटविणे असा होतो. हा प्रकल्प सुरू राहावा म्हणून झटणारे प्रतीक परदेशी म्हणाले, ‘गुगलच्या साहाय्याने काही शब्द मुले शिकू लागल्यानंतर या मुलांना पुढचे भाषिक शिक्षण देण्यासाठी तयारी सुरू केली. मात्र, शेवटी जपानी भाषा अवगत करून त्याची चाचणी देणारे हजारपैकी केवळ पाच जण शिल्लक राहिले. शिक्षक आणि शाळांचा उत्साह चांगला असतो. पण भाषा शिक्षणासाठी सातत्य लागते. हे सातत्य कमी होत आहे. जसजशी भाषेची काठिण्यपातळी समोर येते, तसतसे मुले गळतात, हा अनुभव आहे.’
एका बाजूला जपानी, जर्मनी शिकणारी मुले वाढावीत असे प्रयत्न केले जात असले, तरी या प्रयोगातील सातत्य मात्र राखले जात नसल्याचे दिसून येत आहे.