ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या भावनिक पत्रानंतरही महंत नामदेव शास्त्री दसऱ्या मेळाव्याबद्दल आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. भगवान गडावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी द्यावी, यासाठी पंकजा मुंडे यांनी नामदेव शास्त्री यांना भावनिक पत्र पाठवले होते. या पत्राच्या पार्श्वभूमीवर गडाचे महंत नामदेव शास्त्री म्हणाले की, गडावर राजकीय भाषण नको, हा ट्रस्टचा निर्णय आहे. त्याच्यामध्ये बदल होणार नाही. ज्यांच्या मार्फत पत्र आलं होतं. त्यांच्या मार्फत तसा निरोप पाठवला आहे.
गडाच्या सुरक्षेसाठी गडावर कोणत्याही राजकीय पक्षाचं भाषण नको, अशी भूमिका महंत यांनी यापूर्वी घेतली होती. शास्त्री यांच्या भूमिकेमुळे पंकजा मुंडे यांना मागील वर्षी भगवान गडाच्या पायथ्याला दसरा मेळाव्याचे भाषण करावे लागले होते. मागील वर्षीच्या वादावर पडदा टाकत भगवान गडावर दसरा मेळाव्यासाठी २० मिनिटांचा वेळ द्यावा, अशी विनंती पंकजा मुंडे यांनी पत्राद्वारे केली होती. मात्र महंत यांची भूमिका अद्यापही ठाम आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांचे दसरा मेळाव्याचे भाषण भगवान गडावर होणार की नाही ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी पहिली आणि शेवटची विनंती करते आहे, अशा आशयाचे पत्र पंकजा मुंडे यांनी नामदेव शास्त्रींना लिहिले होते. मी कोणासमोर कधी झुकले नाही पण समाजासाठी नतमस्तक होते आहे, असा उल्लेखही त्यांनी केला होता.