छत्रपती संभाजीनगर : भारताने आपली शक्ती ओळखली आहे. जगानेही ती ओळखली आहे. चार चांगली माणसं आणि चार चांगले नेते झाले म्हणजे देश मोठा होतो असे नाही तर देशातील सामन्य माणसं जोपर्यंत निष्काम कर्मयोगाच्या भावनेशी एकरुप होत नाही आणि आपल्या अंतकरणामध्ये स्वाभिमानाचा भाव निर्माण करतील तेव्हा भारत जगाला दिशा दाखवू शकेल ,असे मत भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले. धुळे जिल्ह्यात पर्यावरणाशी समरस स्थायी काम उभे करणाऱ्या चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचा छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमजीएमचे कुलपती अंकुशराव कदम यांची उपस्थिती हाेती.
सावरकरांना देशाच्या इतिहासात सहा कालखंड सुवर्ण अक्षरांची पाने वाटली होती. सध्याचा कालखंड हा सातवा सुवर्ण अक्षरांनी नोंदवायचा कालखंड आहे. त्यामुळे याच काळात कर्तव्य भावनेने पुरुर्षार्थ गाजववा असे आवाहन भैय्याजी जोशी यांनी केले. आजकाल परिस्थिती बदलेली आहे. पुरस्कारांना शोधत लोक जात होते. पण आता पुरस्कार व्यक्तींना शोधत येतात. ज्यांनी कोणी पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री, भारत रत्न असे पुरस्कार देण्याचे योजिले. त्या कल्पनेला न्याय देणारे काही एक श्रृखंला राहिली, पण काही दिवस राखले गेले. पण आता त्या कल्पनांना सर्वाथांनी न्याय मिळावा अशी नावं गेल्या आठ – दहा वर्षात पुढे आली.
कोणी चैत्राम पवार यांना घडविले असे मी म्हणणार नाही. त्यांच्या आत अंकुरण्याचे बळ हाेते. वनवासी कल्याण आश्रमाने डॉ. आनंद फाटकांना शोधले. ते सहज सापडले असे म्हणत नाही. पण ते या कामात सहज गुंतले. पण अनंत फाटकांनी चैत्राम पवार यांना शोधले हे वैशिष्ट आहे. पण चैत्राम पवार यांच्यामध्ये अव्हानांना तोंड देण्याचे बळ होते. वनवासी कल्याण आश्रमाच्या कामांमुळे ते बीज वाढण्यास भूमी मिळाली. वातावरण मिळाले. त्यामुळे पर्यावरण क्षेत्रातील एक हमरस्ता आता तयार झाला आहे. त्याचा वेग वाढविण्यासाठी आता पुढे काम करावे लागेल, असेही जोशी म्हणाले.
देशात निष्काम कर्म करणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. त्यांची एक मालिका होती. गीतेमध्ये सांगितले म्हणून निष्काम करणारी मंडळी नव्हती तर तशी मंडळी होती म्हणून श्रीकृष्णाने निष्काम कर्माचा उल्लेख गीतेमध्ये केला. चैत्राम पवार यांचे काम याच श्रेणीतील हे काम आहे. कोणताही हिशेब न करता चैत्राम पवार यांनी काम केले. समाज एवढा मोठा आहे की त्यात प्रश्न असणारच पण त्या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेण्यासाठी काम करणारी माणसे आवश्यक असतात. आव्हानांना तोंड देणे हे चर्चा करणारांचे काम नाही, कर्मपथावर चालण्यासाठी धैर्य लागतं, मनाची शांती लागते. वनवासी भागात काम करणाऱ्यांसाठी एक चैत्रराम पवार यांनी वाट तयार केली आहे. एक विकसित अवस्था तयार आहे. तो भाव आपल्या मनात रुजविण्यासाठी हा कार्यक्रम असल्याचे जोशी म्हणाले.