छत्रपती संभाजीनगर : जगण्यासाठी या गावाहून त्या गावाला जाणे हेच आयुष्य… बहुतांशी भिक्षा मागून पोट भरण्यासाठी कधी मरिआईचा गाडा डोईवर घेत हातातल्या ढोलक्यातून गबूगबू आवाज काढणाऱ्या महिला आणि अंगावर आसूड ओढणारे पुरुष असे कुटुंब… केवळ मरिआईचा गाडा ओढणारेच नाही तर नंदीबैलवाले, बहुरूपी, गोपाळ, कुडमुडे जोशी, मसनजोगी अशा किती तरी भटक्या जाती-जमातीतील मुले शिक्षणाच्या मूळ प्रवाहातून दूर राहिली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, किमान प्राथमिक शिक्षणाच्या प्रवाहात ते यावेत यासाठी; या मुलांना स्वच्छता आणि शाळा चांगली असते हे समजावून सांगण्यासाठी ‘भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान’ राज्यभरात ५४ पालावरच्या शाळा चालवत आहे. या शाळेतील शिकविणाऱ्या कार्यकर्त्यांना मानधन तसेच इतर शैक्षणिक सुविधांसाठी दानशूर व्यक्ती आणि संस्थांकडून मदतीची गरज आहे.

हेही वाचा >>> सर्वकार्येषु सर्वदा : भटक्या जमातींना रस्ता शोधून देण्यासाठी धडपड

भटक्या समाजात अनेक प्रकारची व्यसने दिसून येतात. त्यामध्ये महिला-पुरुष असा भेद दिसत नाही. त्यामुळे मुलांनी काय करावे, यापेक्षाही करू नये हे सांगणारी मंडळी भोवताली नसतातच. दिवसभर आई-वडील कामावर जात असतील तर त्यांच्या भोवताली खेळत राहणे, हाच मुलांचा भोवताल असतो. या मुलांच्या विशेषत: मुलींच्या आरोग्याचे प्रश्नही निराळे आहेत. अनेक रुढींनी जखडलेला समाज आहे. माणूस आजारी पडल्यावर दवाखान्यात औषधोपचार करण्याऐवजी नवस करणारी मंडळी अधिक आहेत. भटक्या समाजातील मुलांच्या आयुष्यातील शिक्षणाचे प्रश्न गंभीर आहेत, हे लक्षात आल्यानंतर ‘भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान’च्या वतीने या मुलांच्या शिक्षणासाठी पालावरची शाळा किंवा अभ्यासिका काढण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेण्यात आला.

यापूर्वी तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथे पारधी समाजातील मुलांच्या शिक्षणाचा प्रयोग करण्यात आला होता. गिरीश प्रभुणे यांनी सुरुवातीच्या काळात, नंतर डॉ. अभय शहापूरकर यांनी या प्रकल्पातील मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. आता या प्रकल्पातील अनेक मुले मुली समाजात सन्मानाने जगू लागली आहेत. एक समाज मुख्य प्रवाहात येण्यापर्यंतचा प्रवास सुरू झाला असताना अन्य समाजातील मुलांसाठी कामाचा विस्तार करण्यात आला. यामध्ये विविध जातीजमातीमधील भटक्या समाजातील मुले काही तास अभ्यास करतात. या शाळांना अनुभव शाळाही म्हटले जाते. असे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शैक्षणिक साहित्याची गरज आहे असे ‘भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान’चे उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर यांनी सांगितले. समाजातील प्रश्न सोडविताना त्यांचे ओळखपत्र बनविण्यापासून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम भटक्या विमुक्त प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येते. या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी कार्यकर्त्यांची प्रशिक्षणे तसेच त्यांच्या मानधनातही वाढ होणे आवश्यक असल्याने अशा उपक्रमास आता दात्यांची गरज असल्याचे संस्थेचे कार्यवाह विवेक आयाचित म्हणाले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhatke vimukta vikas pratishthan work for nomadic children education zws