सडपातळ देह, कृष्ण वर्ण, डोक्यावरचे केस पांढरे झालेले. वयोमानानं जबडा आत गेलेला. बोलण्यात प्रचंड उत्साह. पायात स्लीपर आणि त्यावर इन शर्ट करून स्वतःला टापटीप ठेवलेलं. औरंगाबाद येथील ‘बीबी का मकबरा’ येथे प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला गर्दीच्या स्वागतासाठी उभे असलेल्या माणिकराव यांनी गर्दीतही स्वतःचं वेगळं अस्तित्व जपलयं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मकबऱ्यातील वास्तूप्रमाणे शांत स्वभावाच्या या माणसाला कोणी माणिकराव म्हणतं तर कोणी माणिकशेठ म्हणून हाक मारतं. दिवस उगवला की न्याहरी आटोपून घराबाहेर पडायचं. दिवसभर पर्यटकांना मकबऱ्याविषयीची विस्तृत माहिती द्यायची आणि सुर्यास्तानंतर घरी परतायचं त्यांचा दिनक्रम ठरलेला आहे.  या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातूनच मुलीचं लग्न, मुलांचे शिक्षण पूर्ण केलं, असं माणिक म्हस्के सांगतात. मराठवाड्याचे विभागीय केंद्र असलेल्या नोकरीत त्यांना रस नव्हता. ऐतिहासिक वास्तू पाहणं त्याच्याबद्दल माहिती करून घेणं आणि ती इतरांना सांगणं हे त्यांना आवडायचं. त्याच आवडीमुळे वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी ‘बीबी का मकबरा’ या ऐतिहासिक वास्तूमध्ये गाईड म्हणून काम करायला सुरुवात केली. गेल्या ४५ वर्षांपासून न थकता त्यांचं हे काम आजही सुरु आहे. आता त्यांच्या मदतीला दोन सहाय्यकही आहेत. औरंगाबादमधील प्रसिद्ध वास्तू पाहण्यासाठी येणाऱ्या व्हीआयपींना वास्तूविषयी माहिती देण्याची जबाबदारी माणिक म्हस्के यांच्याकडे आहे.

शहरातील विद्युत कॉलनीमध्ये भाड्याच्या घरात माणिक म्हस्के आणि त्यांचं कुटुंब राहतं. जीवनाचं तत्वज्ञान कळण्याच्या अगोदर त्यांच्या डोईवरील वडिलांचं छत्र हरवलं. त्यानंतर मावस भावाने त्यांचा सांभाळ केला. घरची परस्थिती हालाखीची असल्यामुळे त्यांची शिक्षणाची गाडी दहावीतच रखडली. त्याकाळी त्यांना सहज नोकरी मिळाली असती. मात्र, मुक्तपणे जगण्याचा छंद जोपासण्यासाठी त्यांनी गाईड म्हणून काम करायला सुरुवात केली. देश-विदेशातून मकबरा पाहायला पर्यटक यायचे. त्यांच्याशी संवाद साधण्याच्या ओढीनं मातृभाषेसोबत त्यांनी हिंदी गुजराती, बंगाली, फ्रेंच आणि इंग्रजी अशा इतर पाच भाषा आत्मसात केल्या. त्यामुळेच आता व्हीआयपींना गाईड म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि सिमलाच्या माजी राज्यपाल रमा देवी यांचा गाईड म्हणून त्यांना मकबऱ्याविषयी दिलेली माहिती अविस्मरणीय असल्याचे माणिकराव मोठ्या अभिमाने सांगतात.  ते ‘बीबी का मकबरा’विषयी सांगायला लागले की, समोरचा ऐकतच राहतो. मकबऱ्याचे बांधकाम, ताजमहल आणि मकबरा यांच्यातील साम्य, मकबरा आणि परिसरातील छुपे रस्ते याची त्यांना इत्यंभूत माहिती आहे. दिवसाआड एक परदेशी नागरिक यायचा मात्र सध्या परदेशी नागरिकांनी मकबऱ्याकडे पाठ फिरवल्याची असते, याची त्यांनी खंत व्यक्त केली.

“आयना कहता है, सिकंदर के सामने…
कुछ नही, मुक्कदर के सामने…”  हा त्यांचा शेर, गेली चार दशकं. ‘बीबी का मकबरा’ येथे गुंजत आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bibi ka maqbara tourist guide intresting story aurangabad