सुहास सरदेशमुख लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

औरंगाबाद : करदात्यांच्या पैशांतून राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांच्या लाभार्थीनी ‘भाजप’चे मतदार व्हावे या प्रक्रियेस आता दीपावलीचे निमित्त साधून वेग दिला जाणार आहे. लाभ घेतलेल्या व्यक्ती अथवा कुटुंबाने ‘ धन्यवाद मोदीजी’ असे शब्द लिहिलेल्या पोस्टकार्डावर आपल्या भावना लिहून ते कार्ड भाजप कार्यकर्त्यांस द्यावे किंवा त्या कार्डवर तिकिट लावून ते कार्ड टपाल कार्यालयात पाठवावे, अशी प्रचार योजना तयार झाली आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर पंतप्रधानांचा पत्ता असलेले कार्ड वितरित करण्यात आले आहेत.

शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी बँकांचा राजकीय साधन म्हणून सध्या जोरात उपयोग सुरू आहे. मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कर्जमेळावे तर घेतले जात आहेतच, शिवाय विविध योजनांचा लाभ मिळालेले लाभार्थी किती याची वार्डस्तरीय यादी करण्यात आली आहे. हे पोस्ट कार्ड या प्रत्येक लाभार्थीच्या घरी द्यायचे, सोबतीला दीपावलीच्या शुभेच्छा द्यायच्या आणि ‘लाभार्थी’ ने व्यक्त केलेल्या भावनांचे पत्र पंतप्रधानापर्यंत पोहचवायचे, असे या प्रचार मोहिमेचे स्वरूप असणार आहे. गेल्या काही वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्रे विविध योजनांच्या लाभार्थीपर्यंत पद्धतशीरपणे पोहचविण्यात आले.

जेवढे लाभार्थी अधिक तेवढे मतदार होण्याची शक्यता अधिक असल्याने ही प्रचार मोहीम ऐन दीपावलीमध्ये आखण्यात आली आहे. १५ ऑक्टोबर पासून ते २ नोव्हेंबपर्यंत अशी पत्र पाठविली जावीत, अशी रचना भाजपने केली आहे.

पीक विमा योजनेची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यात येणे सुरू झाले असून  केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठीची पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा हप्ताही नुकताच खात्यात देण्यात आला आहे. 

पोस्टकार्डावर काय?

या कार्डावर ‘धन्यवाद मोदीजी’ – ‘अंत्योदय ते भारत उदय’ असे घोषवाक्य लिहिण्यात आले असून त्यात डिजिटल इंडिया, आयुष्यमान भारत, गरीब कल्याण योजना, स्किल इंडिया, पीक विमा योजना, स्वच्छ भारत, आवास योजना, उज्ज्वला योजना दिल्याबद्दल धन्यवाद देत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

होणार काय? उज्ज्वला योजना, पंतप्रधान स्वनिधी योजना, ‘मुद्रा’ योजनेतील कर्जदार, आवास योजनेतून दोन ते अडीच लाखांची सवलत मिळविणारे शहरी लाभार्थी यासह सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थीना पोस्टकार्ड दिले जाणार आहेत. हे सारे करताना ज्या घरात लाभ मिळणे शिल्लक आहे, अशा मतदारांना ते लाभ मिळावेत अशासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.

आनंद शिधाच्या पाकिटावर मोदी-शिंदे-फडणवीसांची छबी

लाभार्थी मतदार करण्याच्या प्रक्रियेत दिवाळीसाठी १०० रुपयांच्या शिधावाटपाच्या पाकिटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चित्र प्रकाशित करून त्याच्या वाटपाची तयारी सुरू झाली आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp distributed postcards written with dhanyavad modi ji to beneficiaries of government schemes zws