काही दिवसांपूर्वीच शिवसेना ( ठाकरे गट )पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना वीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा दिला होता. त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये मतभेत निर्माण झाल्याचं बघायला मिळालं. अशातच आता राहुल गांधी उद्धव ठाकरेंची ‘मातोश्री’वर येऊन भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, यावरून भाजपाचे आमदार तथा मंत्री अतुल सावे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.
नेमकं काय म्हणाले अतुल सावे?
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून रोज वेगवेगळी विधानं येत आहेत. सकाळी नाना पटोले एक विधान करतात, त्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे वेगळी विधानं करतात, यावरून महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याचं दिसून येते. केवळ भेट घेऊन समन्वय होत नसतो, तर तो समन्वय विचारांमध्ये असावा लागतो. पण त्यांच्या विचारामध्ये समन्वय नाही. तर कितीही वेळा एकमेकांची भेट घेतली, तरी काहीही उपयोग होणार नाही, अशी टीका मंत्री अतुल सावे यांनी केली.
पंकजा मुंडेच्या कारखान्याबाबतही दिली प्रतिक्रिया
पुढे बोलताना त्यांनी पंकजा मुंडेच्या कारखान्यावर पडलेल्या छाप्याबाबतही प्रतिक्रिया दिली. पंकजा मुंडेंच्या कारखान्याप्रमाणे राज्यातील अनेक कारखाने आज आर्थिक अडचणीत आहेत. अशा कारखान्यांना एनसीडीसीद्वारे मदत केली जाते. महाराष्ट्रातील अशा नऊ कारखान्यांचे प्रस्ताव एनसीडीसीकडे पाठवण्यात आले आहेत. त्यातून त्यांना आर्थिक मदत केली जाईल. याद्वारे पंकजा मुंडेंच्या कारखान्यालाही आम्ही मदत करू, असं ते म्हणाले.
हेही वाचा – “मी गंगा-भागिरथी नाही”, यशोमती ठाकूर कडाडल्या, म्हणाल्या, “महिलांना पुन्हा गुलामगिरीच्या जोखडात..”
बाबासाहेबांच्या स्मारकावरुन मविआवर आरोप
दरम्यान, यावेळी बोलाताना त्यांनी इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम महाविकास आघाडीमुळे रखडलं असा आरोपही केला. इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाचं भूमीपूजन पंतप्रधान मोदी यांनी केलं होतं. मात्र, महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांत या स्मारकाचं काम रखडलं. त्यामुळे त्यांनी आधी या स्मारकासाठी काय केलं, याचं आत्मपरिक्षण करावं आणि त्यानंतर आमच्यावर आरोप करावे, असे म्हणाले.