लोकसत्ता प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : परळीतील भाजपचे ज्येष्ठ नेते, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे सहकारी, वैद्यनाथ बँकेचे विद्यमान संचालक विकासराव डुबे यांचे चिरंजीव तथा स्थानिक व्यावसायिक अमोल डुबे (वय ४२) यांचे सोमवारी रात्री पाच अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून त्यांना बंदुकीचा धाक दाखवत दोन कोटींची खंडणी मागितली. अंबाजोगाई मार्गावर १० तोळे सोने, तीन लाख असे ८ लाख २८ हजार रुपये दिल्यानंतर सुटका झाली असून, पोलिसांना सांगितले तर जिवंत ठेवणार नाही, अशा शब्दांमध्ये धमकावले, अशी तक्रार अमोल डुबे यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात सोमवारी दुपारी दीड वाजता दिली असून, याप्रकरणी पाच अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार अमोल डुबे हे कॅस्ट्रॉल ऑईल, एमरॉन बॅटरी, सीएट टायर, फ्लीट गार्ड आदी एजन्सीचे व्यावसायिक असून, सोमवारी रात्री ८७ हजार रुपयांची रोकड घेऊन दुचाकीवरून घरी निघाले होते. त्यांच्या दुकानापासून काही अंतरावर गेले असता एका कारमधून चार जण तोंडाला रुमाल बांधलेले व्यक्ती उतरले व डुबे यांना पकडून कारमध्ये जबरदस्तीने बसवले. कारमधील एका व्यक्तीने बंदुकीचा धाक दाखवून पकडून ठेवले. कार दोनवेळा कन्हेरवाडी घाटात बंद पडल्यानंतर डुबे यांच्याकडे दोन कोटींची मागणी केली. तेवढी रक्कम उपलब्ध नसल्याचे सांगून डुबे यांनी पत्नीला फोन केला. त्यानंतर त्यांचे मित्र प्रवीण श्रीनिवास बंग यांना फोन करून रक्कमेबाबत विचारणा केली. त्यांनी रोख तीन लाख व १० तोळे असल्याचे सांगितले. ते सर्व डुबे यांच्या चालकाकडून घाटात मागवली. तेथे सर्व ऐवज अज्ञातांकडे दिल्यानंतर सुटका करून घेतल्याचे डुबे यांनी तक्रारीत म्हटले आहे.