छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यात भाजपच्या सदस्य नोंदणीची आकडेवारी काठावर पास झाल्यासारखी आहे. नोंदणीसाठी जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रनिहाय प्राथमिक सदस्यता नोंदणीचे ४ लाख ८३ हजार २०० एवढे उद्दिष्ट देण्यात होते. मात्र नोंदणी एक लाख ७५ हजार सदस्यांपर्यंत झाली. तर सक्रिय सदस्यता नोंदणी १ हजार ४०० झाली आहे. सर्वाधिक नोंदणीमध्ये आष्टीचा क्रमांक आहे. तर सर्वात कमी नोंदणी झालेल्या विधानसभा क्षेत्रात गेवराई असून, त्यानंतर परळीचा क्रमांक आहे. मात्र, या नोंदणीत काही वाढही झालेली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अपेक्षेपेक्षा कमी नोंदणी होण्यामागे कार्यकर्त्यांचा राजकीय अनुत्साह, पंकजा मुंडेंचा लोकसभा निवडणुकीतील पराभव, संतोष देशमुख हत्या प्रकरण, आरक्षण आंदोलन, या सारख्या राजकीय, सामाजिक घडामोडींचाही कमी-अधिक परिणामांची कारणे सांगितली जात आहेत.
भाजपकडून प्राथमिक सदस्य संख्या करण्यासाठी दीड कोटींचे उद्दिष्ट ठेवून नोंदणीचे अभियान अलिकडेच राबवण्यात आले होते. त्याची जाहिरातबाजीही ६ एप्रिल रोजीच्या पक्षाच्या स्थापना दिनी जोरदार करण्यात आली होती. परंतु अनेक जिल्ह्यात सदस्यता नोंदणीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र असून, पक्षाच्या १२ जानेवारी रोजीच्या अहवालात सर्वात कमी नोंदणी झालेल्या पहिल्या पाच विधानसभा क्षेत्रात बीड जिल्ह्यातील परळीचे नाव आले आहे. त्यादिवशी परळीमध्ये १ हजार ५९९ एवढी प्राथमिक सदस्यता नोंदणी झाल्याची माहिती पक्षाच्या विधानसभा निहाय प्राथमिक सदस्य अभियान अहवालातून समोर आली आहे.
परळी विधानसभा क्षेत्रासाठी ७२ हजार ६०० एवढी प्राथमिक सदस्यता नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १९ हजार ३३३ एवढी सदस्य नोंदणी झाली आहे. गेवराई विधानसभा क्षेत्रासाठी ८० हजार ८०० सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, केवळ १२ हजार १६९ सदस्य नोंदणी झाली असल्याची पक्षाच्या सूत्रांकडून मिळाली.
जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा क्षेत्रात प्राथमिक सदस्य नोंदणीसाठी ७८ हजार ६०० उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु नोंदणी १८ हजार १६९ एवढी झाली. बीडसाठी ७९ हजार २०० पैकी २१ हजार ८७ एवढी प्राथमिक सदस्यता नोंदणी झाली आहे. भाजपचे आमदार सुरेश धस प्रतिनिधीत्व करत असलेल्या आष्टी विधानसभा मतदारसंघात ८८ हजार उद्दिष्ट असून ४५ हजार ७९२ नोंदणी झाली आहे. तर केजमध्ये ८४ हजार पैकी ३४ हजार ८१९ नोंदणी झाली आहे.
सक्रिय सदस्यता नोंदणी एक हजार ४०० एवढी झाली आहे. पक्षाच्या रचनेनुसार सक्रिय सदस्य हा बुथ प्रमुख म्हणून नियुक्त केला जातो. बीड जिल्ह्यात २ हजार ४०६ बुथ आहेत. ३ बुथ प्रमुखामागे एक शक्तिकेंद्र प्रमुख नियुक्त असतो. सक्रिय सदस्यांनाही त्यांच्यासारखीच सदस्य करायचे उद्दिष्ट देण्यात येते.
बीड जिल्ह्यात प्राथमिक सदस्यता नोंदणी ही १ लाख ७५ हजार एवढी झाली आहे. तर एक हजार ४०० सक्रिय सदस्यता नोंदणी झाली आहे. – देवीदास नागरगोजे, सरचिटणीस, बीड जिल्हा.