जालना जिल्ह्य़ातील बदनापूर मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार नारायण कुचे यांच्यावर अपशब्द वापरून जाणीवपूर्वक अपमानित केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्या समवेत असणारे पोलीस शिपाई सागर साठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकाळी ११.४०च्या सुमारास दूरध्वनीवरून आमदार कुचे यांनी सुरक्षारक्षक साठे यास शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी येथे नगरसेवक राहिलेले नारायण कुचे या वेळी भाजपच्या तिकिटावर बदनापूर मतदारसंघमधून आमदार म्हणून निवडून आले. त्यांचा आजही शहरात अनेकांशी संपर्क आहे. त्यांच्याकडे एक महिला सातारा पोलीस ठाण्याची तक्रार घेऊन आली होती. त्या संदर्भाने आयुक्त बाहेती यांना आमदार कुचे यांनी फोन केला होता. मात्र, जेव्हा त्यांचा दूरध्वनी आला तेव्हा सहायक आयुक्त बाहेती त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. त्यांचा फोन गाडीतच होता. वारंवार फोन आल्याने त्यांच्यासमवेत असलेल्या सागर साठे यांनी तो उचलला. साहेब, त्यांच्या मित्रांना भेटण्यासाठी गेले आहेत, असे त्यांनी आमदारांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमदारांनी त्यांना शिवीगाळ केली. अशा पद्धतीच्या वागणुकीमुळे समाजात वाईट संदेश जात असल्याचा आरोप वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही केला. झालेला प्रकार वाईट होता. साठे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कलम ५०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.