गंगापूर मतदारसंघाचे भाजपाचे आमदार प्रशांत बंब आणि एका माजी उपसरपंचामध्ये भर सभेत बाचाबाची झाल्याची घटना समोर आली आहे. ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचारावर आमदार आणि माजी उपसरपंच आपसात भिडले. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माजी उपसरपंच आणि आमदारांचा हा वाद जिल्ह्यात चर्चेत विषय बनला आहे.
भाजपा आमदार प्रशांत बंब ‘जनता दरबार’ कार्यक्रमानिमित्त नागरिकांना मार्गदर्शन करत होते. यावेळी सभास्थळी उपस्थित असलेल्या माजी उपसरपंचाने ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आक्रमक भूमिका घेतली. यावेळी दोघांनी एकमेकांना अनेक प्रतिप्रश्न केले. आमदारांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही, असा आरोप करत माजी उपसरपंच आक्रमक झाले. तुम्ही केवळ सकारात्मक बोलता, पण नकारात्मक कामं करता. कधी सकारात्मक कामंही करा, असंही माजी उपसरपंच बोलत असल्याचं व्हायरल व्हिडीओत दिसत आहे.
दुसरीकडे, आमदार प्रशांत बंब संबंधित उपसरपंचाला उद्देशून युक्तीवाद करत आहेत. “तू आधी खोटं बोलला की नाही, तू आधी माझं ऐकून घे… प्लिज तू असं करू नकोस… तुला जे बोलायचं ते नंतर बैठक घेऊन बोल. मी यांचं ऐकून घेतलं आहे. मी १५ तारखेच्या आत नागरिकांशी बोलतो…”, असे उद्गार प्रशांत बंब काढताना व्हायरल व्हिडीओत दिसत आहे.