सुहास सरदेशमुख
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून डॉ. भागवत कराड आणि भाजपला जर निवडून आणायचे असेल तर ‘एमआयएम’च्या इम्तियाज जलील यांनी निवडणूक लढविणे आवश्यक आहे. तशी आमची दोस्ती आहे, असे हसत हसत सांगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजपच्या राजकारणाची अपरिहार्यता स्पष्ट केली.
‘दिशा’ या केंद्रीय योजनांच्या बैठकीनंतर बोलताना भाजपच्या राजकारणावर दानवे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचा रंग ‘हिंदू-मुस्लीम’ असावा असेच प्रयत्न होत राहतील, असे संकेत त्यांनी दिल्याचे मानले जात आहे. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ युतीमध्ये असताना शिवसेनेच्या ताब्यात होता. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर ही जागा शिंदे गटाकडे जाईल असा दावा केला जात होता, पण त्यात फारसा जोर नव्हता. त्यामुळे आता ही जागा भाजपचीच आहे आणि येथून आपण निवडणूक लढविण्यास इच्छुक आहोत, असे अलीकडेच डॉ. भागवत कराड यांनी जाहीर केले आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी प्रत्येक तालुका पातळीवर बैठका घेऊन लोकसभा निवडणुकीची तयार केलेली आहे. अगदी गावनिहाय आणि विधानसभा मतदारसंघनिहाय कोणत्या जातीचे, कोणत्या धर्माचे मतदार किती याचेही तपशील मिळविले आहेत. या लोकसभा मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या चार लाख १५ हजार एवढी आहे.
अनुसूचित जाती व जमातीचे मतदार तीन लाख ७७ हजार एवढे आहेत. तर मराठा मतदारांची संख्या साडेपाच लाखांच्या घरात आहे. मराठा समाज एकवटला की त्याविरोधात ओबीसींचे एकत्रीकरण होते, असा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा अनुभव आहे. या विभाजनामुळे इम्तियाज जलील यांना तीन लाख ८८ हजार ७८४ मतदान मिळाले होते, तर प्रतिस्पर्धी उमेदवार चंद्रकांत खैरे यांना तीन लाख ८४ हजार ५५० मते मिळाली होती. तेव्हा भाजपही खासदार चंद्रकांत खैरे यांना मतदान मिळावे म्हणून प्रयत्न करत होता. आता शिवसेनेत फूट पडली आहे आणि भाजपची प्रतिमा कमालीची बदलली आहे. सिंचन क्षेत्रात मोठा घोटाळा केल्याचा आरोप बैलगाडीभर पुरावे देणाऱ्या भाजप नेत्यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्या अजित पवार यांच्याशी त्यांनी राजकीय मैत्री केली. सत्तेत त्यांना मानाचे पान दिले. त्यामुळे भाजपमधील एक गट कमालीचा दुखावला गेला आहे. अशा काळात रावसाहेब दानवे यांनी हसत हसत व्यक्त केलेले मत राजकीय दिशा स्पष्ट करणारे असल्याचे मानले जात आहे.
मुस्लीम मते एकगठ्ठा करता येणारा पक्ष म्हणून ‘एमआयएम’कडे पाहिले जाते. मुस्लीम एक होताहेत, म्हणून हिंदू मते एकगठ्ठा करता येतील, या मानसिकतेतून रावसाहेब दानवे यांनी जलील यांना येत्या लोकसभा निवडणुकीत आवश्यक असल्याचे म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पूर्वी सुरू केलेली तयारी नव्या राजकीय गणितांमुळे नव्याने हाती घ्यावी लागणार आहे. त्याला धर्माच्या आधारे पुढे नेता यावे अशी भाजपच्या रणनीतीची बाब रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली आहे.