पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळय़ाचे आयोजक सुधींद्र कुळकर्णी यांच्यावर शिवसेनेने फेकलेल्या शाईने राज्यातील भाजप सरकारचा चेहरा पुरता काळा केला असून, सरकारला तोंड लपवायला जागा ठेवली नाही. राज्यातील भाजप सरकार केवळ मंत्रालयापुरते मर्यादित असून, राज्यातल्या रस्त्यांवर होणारी ही झुंडशाही मुख्यमंत्री थांबवतील, असे आम्हाला वाटत नाही आणि तशी अपेक्षाही नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
भाजप-शिवसेना या दोन पक्षांची राज्यात संयुक्त सत्ता आहे. परंतु गुंडशाही, झुंडशाही करण्यात हेच पक्ष आघाडीवर आहेत. गज़्ाल गायक गुलाम अलींचा मुंबईतील कार्यक्रम शिवसेनेमुळे आधीच रद्द झाला. सरकारच्या विचारधारेशी सुसंगत नसणारा प्रत्येक विचार दाबण्यात येत आहे. पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल आता तालिबानी राजवटीच्या दिशेने होते आहे की काय अशी भीती जनतेच्या मनात आहे. देवेंद्र फडणवीस यांचे भाजप सरकार ही गुंडशाही थांबविण्यास असमर्थ असल्याचे सिद्ध झाले आहे, हे सर्वात क्लेशदायक आणि निराशाजनक आहे, असे मुंडे यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवसेनेची सर्व आघाडय़ांवर कोंडी केली आहे. शिवसेनेचा अपमान, अवहेलना करण्याची एकही संधी भाजप सोडत नाही. मंत्रालयात बसणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांना कुठलीही महत्त्वाची खाती, अधिकार नाहीत अशी स्थिती आहे. भाजपकडून शिवसेनेचे खच्चीकरण होत असल्याचा राग शिवसेना अशा पद्धतीने रस्त्यावर सर्वसामान्य माणसांवर काढण्यात धन्यता मानत आहे. खासदार संजय राऊत यांनी तर ही किरकोळ प्रतिक्रिया आहे, अशी धमकी दिली आहे. त्यामुळे पुढची प्रतिक्रिया ही कोणाचा तरी बळी जाण्यात होऊ शकते, अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे व्यक्त केली.

Story img Loader