लोकसत्ता प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील गेवराई शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या अर्धमसला गावातील एका प्रार्थनास्थळात रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास केलेल्या स्फोटातील आरोपींविरुद्ध देशविघातक कृत्य केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. मुस्लिम आरोपी असेल तर त्याच्या घरावरून बुलडोझर घातले जाते. आता अर्धमसला येथील आरोंपींना देशविघातक कृत्य केल्याचा गुन्हा का दाखल नाही, असे ते म्हणाले.

हा स्फोट जिलेटिन कांड्यांनी घडवून आणला असून या आरोपींनी स्फोट घडवून आणण्यापूर्वी स्वत: सह घटनेचे छायाचित्रण केले असल्याची माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली. दोघा संशयितांना अटक केल्याची माहिती तलवाडा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके यांनी दिली. या घटनेनंतर शांतता राखण्यासाठी सर्व उपाययोजना केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा, बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांनी भेट दिली होती. पोलिसांनी उचललेली पावले योग्य होती, असेही जलील म्हणाले.

गावामध्ये शनिवारी रात्री एक धार्मिक मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी दोन माथेफिरूंनी जातिवाचक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी समजावून सांगून वाद मिटवण्यात आला. मिरवणूकही शांततेत पार पडली. मात्र, मध्यरात्री अडीचच्या सुमारास अचानक प्रार्थनास्थळातून मोठ्ठा आवाज झाला. परिसरातील नागरिक एकत्र आले. यावेळी अटक केलेल्या दोन संशयितांना घटनास्थळापासून पळून जाताना काही नागरिकांनी पाहिले.

या घटनेची माहिती मिळताच तत्काळ तलवाडा पोलीस दाखल झाले. यावेळी काही नागरिकांनी घटनास्थळावरून पळून गेलेल्या दोघांची माहिती दिली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. पकडलेल्या एका संशयिताने स्फोटाच्या ठिकाणचे चित्रीकरण करून त्याच्या समाजमाध्यमाच्या खात्यावरही प्रसारित केले. मात्र, या घटनेतून वेगळा संदेश दूरपर्यंत जाऊ नये, यासाठी विविध जाती समुदायातील नागरिक एकत्र आले. त्यांनी स्फोटाच्या घटनेचा दोन्ही सण साजरे करण्यावर परिणाम होऊ द्यायचा नाही, असा निर्णय घेतला.