छत्रपती संभाजीनगर : भविष्यात शहराच्या जलवाहिनीबाबत काही प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बजावले. नऊशे मिमी व्यासाच्या जलवाहिनीत गळती शोधणे, तसेच जलवाहिनीतून ७५ एमएलडी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी चार दिवसांनंतर ४८ तासांच्या शटडाउनलाही उच्च न्यायालयाने परवानगी दिली.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने काम केले नसल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर वारंवार फुटणाऱ्या नऊशे मिमी व्यासाच्या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यासाठी न्या. रवींद्र घुगे व न्या. आश्विन भोबे यांनी चार दिवसांनंतर ४८ तासांचा शटडाउन मागण्यास अनुमती दर्शविली. हायड्रोलिक टेस्टअभावी जलवाहिनी फुटत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. करारात टेस्टिंग होती तेव्हा का घेतली नाही अशी विचारणाही करण्यात आली.

नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामासंबंधी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने पाणीपुरवठा योजनेवर लक्ष केंद्रीत केलेले आहे. नऊशे मिमी व्यासाची जलवाहिनी तीन मीटर जमिनीखाली बसविण्याची आवश्यकता होती. परंतु काही इंच जमिनीखाली बसविल्याने २५०० मिमि व्यासाच्या जलवाहिनीस त्यामुळे अडथळे निर्माण होत आहेत. जीव्हीपीआरचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. आर. एन. धोर्डे यांनी यासंबंधी १०० पेक्षा जास्त छायाचित्रे न्यायालयात सादर केली. उच्च न्यायालयाच्या १२ मार्च रोजीच्या आदेशात ही बाब नमूद करण्यात आली आहे.

सर्च टँकसाठी इसारवाडी येथे जागा देण्यास महावितरण कंपनीने असमर्थता दर्शविली असल्याचे न्यायालयात त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केले. बटर फ्लाय व्हॉल्व्ह बसविण्यासाठी ८ मीटर जागा उपलब्ध करून द्यावी, असे जीव्हीपीआरच्या वतीने सांगण्यात आले. २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीस ६५०० वेल्डिंग असल्याचे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यासाठी हायड्रॉलिक टेस्टिंग गरजेची असल्याचे सांगण्यात आले. विधानमंडळात अधिवेशनप्रसंगी न्यायालयाच्या निर्णयाचा चुकीचा संदर्भ देण्यात आला. योजनेच्या कामासंबंधी न्यायालयाकडून आढावा घेतला जात असून, राजकीय मंडळींनी यासंबंधी बोलू नये असे बजावण्यात आले.

मे पर्यंत २२ जलकुंभ हस्तांतरित

शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी मे अखेरपर्यंत २२ टाक्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मनपाकडे हस्तांतरित करणार आहेत. आतापर्यंत पाच पाण्याच्या टाक्या हस्तांतरित करण्यात आल्याचे मनपाच्या वतीने ॲड. संभाजी टोपे यांनी सांगितले.