राज्यात येत्या काळात दीड लाख कोटींचे रस्ते उभारण्याचा संकल्प केला आहे, त्यासाठी ९५ लाख टन सिमेंट राखून ठेवले आहे. मी केवळ घोषणा करणारा मंत्री नाही, तर त्या पूर्ण झाल्या नाहीत तर हवी ती शिक्षा भोगेन, असे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. औरंगाबाद येथे मराठवाडय़ातील १५ हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
मुंबईहून लंडनला माल पाठवणे स्वस्त आहे, पण दिल्लीला माल पाठवणे महाग असल्याचे उद्योजक सांगतात. यावर उपाय म्हणून येत्या काळात जलमार्ग सुरू केले जाणार असून आत्तापर्यंत १११ नदीमार्ग पूर्ण केले जाणार आहेत. पैकी ३६ जलमार्गाचा प्रकल्प आराखडाही तयार करण्यात आला आहे. या सर्व प्रकल्पांसाठी निधीची कमतरता पडणार नाही, कारण जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टसह वेगवेगळ्या पंधरा कंपन्या नफ्यात आहेत. शिवाय ४ हजार कोटी डॉलरचे कर्ज कमी व्याजदरात उपलब्ध करून घेत आहे. त्यामुळे येत्या काळात एअरपोर्टसारखे वॉटरपोर्ट उभे करण्याचा प्रयत्न राहील.
ग्रामीण भागातील शेतमालाची निर्यात वाढावी म्हणून जालना येथे उभारण्यात आलेल्या ड्रायपोर्टचा अधिक फायदा होईल असेही त्यांनी सांगितले. या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील ४ हजार ४२ कोटी रुपयांची कामे केंद्रीय रस्ते निधीतून मंजूर केल्याबद्दल गडकरी यांचे आभार मानले. या वेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, हरिभाऊ बागडे, चंद्रकांत खैरे यांचीही समयोचित भाषणे झाली.

Story img Loader