लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्रपती संभाजीनगर : दोन कोटींच्या खंडणीसाठी बिल्डरच्या सातवर्षीय मुलाचे कारमध्ये कोंबून अपहरण करण्यात आले. ही घटना शहराच्या गजबजलेल्या वस्तीचा भाग असलेल्या उच्च न्यायालयाच्या मागील बाजूस असलेल्या सिडको एन ४ मध्ये घडली. या घटनेनंतर पोलीस विभाग सतर्क झाला असून, चौकाचौकांत नाकाबंदी करण्यात आली आहे. कार आणि अपहरणकर्त्यांचा शोध सुरू आहे. चैतन्य तुपे असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव असून, त्याचे वडील सुनील तुपे हे बिल्डर आहेत.

चैतन्य हा वडिलांसोबत सायकल चालवित फिरत होता. सुनील तुपे हे चालताना काहीसे मागे पडले व सायकल चालवित चैतन्य पुढे निघून गेला. त्याचवेळी एक कार चैतन्यजवळ आली. कारमधील व्यक्तींनी चैतन्यला जवळ बोलावले. दार उघडून आतील व्यक्तींनी चैतन्यला कारमध्ये कोंबले. एका अपहरणकर्त्याने चैतन्यची सायकल रस्त्याच्या बाजूला नेऊन ठेवली, दुसरा अपहरणकर्ता कारच्या बाहेरच उभा होता. विजेच्या वेगाने दोघे कारमध्ये बसले आणि सुसाट वेगाने ते निघून गेले.

हा प्रकार सुनील तुपे यांच्या लक्षात येताच त्यांनी धावत त्यांना गाठण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत कार निघून गेली होती. काही मिनिटातच सुनील तुपे यांना हिंदीतून संभाषण करणारा फोन आला. त्यातून त्यांना दोन कोटींची खंडणी मागण्यात आली. या प्रकारानंतर पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त शीलवंत नांदेडकर, सहायक पोलिस आयुक्त सुदर्शन पाटील यांच्यासह गुन्हे शाखा आणि अख्खे शहर पोलिस दल चैतन्यच्या शोधासाठी रस्त्यावर उतरले.

चैतन्य हा केंब्रीज शाळेचा विद्यार्थी असून, त्याला सायकल खेळताना पळविण्यात आले. त्याच्या अंगात गुलाबी रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची फुल पँट असून डाव्या डोळ्याखाली जुन्या जखमेची खूण आहे.