क्रांतीचौक पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या समर्थनगरातील व्यंकटेश अपार्टमेंटमध्ये शिरलेल्या चोरांनी सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास आठ मिनिटांत एक घर साफ केले. भर दिवसा झालेल्या या घरफोडीत ५० तोळे सोन्यांच्या दागिन्यांसह १ लाखांची रोकड चोरट्यांनी लांबवली. या खळबळजनक घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. पाळत ठेऊन ही घरफोडी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. इमारतीच्या सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहेत. त्यानुसार चोरटे सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सुनिता धर्मेंद्र पुराणिक (वय ३८, रा. फ्लॅट क्र. ५, व्यंकटेश अपार्टमेंट, समर्थनगर) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर्वीच पुराणिक कुटुंब या फ्लॅटमध्ये भाड्याने रहायला आले आहे. अजिंठा अर्बन बँकेत कामाला असलेल्या सुनीता पुराणिक जाधवमंडीतील शाखेत नोकरीला आहेत. सोमवारी सकाळी त्या नेहमीप्रमाणे बँकेत गेल्या होत्या. तर त्यांचा मुलगा वरद दहावीच्या शिकवणीसाठी आणि मुलगी शाळेत गेली होती. यावेळी घरात कोणी नसल्याचे पाहत हा दरोडा टाकण्यात आला.

दुपारी दीड वाजता क्रांतीचौक पोलिस ठाण्यासमोरील चौकातून दुचाकीवर आलेले चोरटे अपार्टमेंटपासून काही अंतरावर थांबले होते. तिथून चष्मा असलेला चोरटा पायी अपार्टमेंटपर्यंत आला. तर त्याचा साथीदार दुचाकीसोबत अपार्टमेंटच्या खाली थांबला. यानंतर अपार्टमेंटच्या तिस-या मजल्यावर गेलेल्या चोरट्याने ५ नंबरच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे लॅच लॉक तोडले आणि तो आत शिरला. त्यानंतर त्याने घरातील थेट कपाट उचकटले. कपाटाच्या ड्रॉवरमध्ये असलेले ५० तोळे सोने आणि १ लाखांची रोकड असलेली लाल रंगाची बॅग त्याने उचलली आणि तो घराबाहेर पडला आणि खाली उभ्या असलेल्या आपल्या साथीदारासोबत फरार झाला.

दरम्यान, दुपारी पुराणिक यांचा मुलगा वरद हा घरी परतला. यावेळी चोरटा घरातच होता. वरदला पाहून अपार्टमेंटखाली उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराने घरातल्या चोरट्याला सांकेतीक इशारा केला. त्यामुळे फ्लॅटमधील चोरटा दागिने आणि पैशांची बॅग घेऊन लगबगीने खाली उतरु लागला. तेव्हा वरद आणि चोरटा दुसऱ्या मजल्याच्या जिन्यावर समोरासमोर आले होते. त्यानंतर वरद घरात गेल्यानंतर त्याला कपाट उचकटलेले दिसून आले. त्यानंतर त्याने तत्काळ आई सुनीता यांना फोन करुन घरफोडी झाल्याची माहिती दिली. त्यानंतर या प्रकाराची माहिती पोलिसांना कळवण्यात आली.

Story img Loader