प्रदेश कार्यसमितीमध्ये प्रचार रणनीती

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद</strong>

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात  भाजप प्रचाराची रणनिती कशी असेल, या प्रचाराला सर्वसामांन्याकडून कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात याची रंगीत तालीम जालना येथील राज्यस्तरीय कार्यसमितीच्या बैठकीमध्ये करण्यात आली. राफेल प्रकरणातील गैरव्यवहारचे आरोप आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल, स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणी आणि त्यावर त्यांनीच लिहिलेले उत्तर, महाआघाडीतील घटक पक्षाच्या नेतृत्त्वावर उभे केले जाणारे प्रश्नचिन्ह असे अनेक मुद्दे नेत्यांनी त्यांच्या भाषणात मांडले तरी कृषी समस्येवर प्रचारादरम्यान भाजपला प्रश्न विचारले जाऊ शकतात, याचा अंदाज देणारी मंगळवारची बैठक असल्याचे दिसून आले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघात झालेल्या कार्यकारिणीच्या  बैठकीमध्ये उद्घाटनाच्या सत्रात दानवे यांनी केलेल्या भाषणाचा नूर काहीसा गंभीर होता. कोणताही हशा नाही की कार्यकर्त्यांनी टाळी वाजवली नाही. ही गंभीरता निवडणुकांमुळे आली असल्याचे निष्कर्ष भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी डॉ. सरोज पांडे यांनी काढला. पण या बैठकीमध्ये मांडण्यात आलेला मराठवाडय़ाच्या विकासाचा ठराव भुवया उंचवायला लावणारा होता. मराठवाडय़ाच्या विकासाचा ठराव भाजपच्या बैठकीमध्ये नव्याने का मांडण्यात आला आणि त्याचा अर्थ हा भाग अविकसित ठेवण्यात काहीसे कमी पडल्याची कबुली असल्याचेही मानले जाते. पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी हा ठराव मांडल्यानंतर परभणी जिल्हय़ातील पालम तालुक्यातील गणेश रोकडे यांनी आता मराठवाडय़ाचा विकास करायचा असेल तर सातबारा कोरा करायला हवा अशी मागणी केली. सरसकट कर्जमाफी हा त्यावरचा इलाज असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या या जाहीर मागणीनंतर ठरावावर चर्चा करण्याऐवजी त्याबाबतच्या लेखी सूचना कराव्यात, असे आदेश भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले. चर्चेला जागाच नाही, असा माहोल त्यामुळे निर्माण झाला. गणेश रोकडे यांनी हा मुद्दा का मांडला, असे कोणी त्यांना विचारले नाही. ‘ मी जे काही मांडले त्यात काही चूक नव्हती. जे सांगायला हवे ते सांगितले.’ असे ते नंतर ‘लोकसत्ता’शी बोलतानाही म्हणाले.

या प्रश्नाच्या भोवतीनंतर नेत्यांच्या भाषणातून व्यक्त झालेली मते भाजप प्रचारातील निखळलेला सांधा कोणता असेल हे सांगणारी होती. कृषी प्रश्नावर प्रचारादरम्यान लोक प्रश्न विचारतील, असा अंदाज असल्याने मुख्यमंत्र्यांनी मग आपल्या भाषणातील एक भाग जलयुक्त शिवार, पंतप्रधान सिंचन योजना, कमी पावसामध्ये उत्पादकतेत झालेली वाढ या मुद्दय़ावर न्यावा लागला. कर्जमाफीसाठीची छत्रपती सन्मान योजना अजूनही सुरूच राहील, या शिवाय दुष्काळग्रस्तांना फेब्रुवारीपर्यंत मदत दिली जाईल असे सांगावे लागले. पण असे करताना बहुतांश नेत्यांनी सांगितले, आता सल्ले देत बसू नका, संघटना सांगेल तेवढे काम करा. राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्वसामांन्यापर्यंत नेला जाईल. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींवर त्यांनी लिहिलेल्या लेखाचा आधार घेत भाजप लोकसभा निवडणुकीमध्ये आरोपाचे खंडन करेल. कार्यकर्त्यांचा हातात प्रतिउत्तराची ही कागदे असल्याचे सांगत ‘जनधन’, ‘उज्वला’, ‘मुद्रा’ यावर जोर दिला जाईल, असे नेत्यांच्या भाषणातून दिसून आले.

पंकजा मुंडे वगळता नोटबंदीच्या निर्णयावर मात्र फारसे कोणी बोलले नाही. हा विषय भाजपच्या प्रचारात असणार नाही, असे संकेत दिले जात होते. प्रचाराच्या रणनितीमध्ये काँग्रेसवर केली जाणारी घराणेशाहीची टीका अधिक टोकदार केली जाईल, महाआघाडीकडे नेतृत्व कसे नाही, हेही जरा मोठय़ा आवाजात सांगितले जाईल, असा नेत्यांच्या भाषणाचा सूर होता.

युतीच्या नमत्या भूमिकेविरोधात उत्साह

युतीच्या अनुषंगाने भाजपने जरा अधिकच नमती भूमिका घेतली असल्याचे निर्माण झालेले चित्र पुसून काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला पुढाकार कार्यकर्त्यांचा उत्साह वाढणारा होता. मंगळवारच्या बैठकी दरम्यान मंत्र्यांची भाषणे सुरू असताना अधून-मधून येणाऱ्या घोषणांचे आवाज तसे क्षीण वाटावे असेच होते. मात्र, युतीसाठी भाजप लाचार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगताच आवाजही वाढला. तोपर्यंत नेते सांगताहेत, आपण ऐकू, असेच बठकीतील वातावरण होते. हिंदुत्व ज्यांना हवे आहे ते आपल्याबरोबर येतील आणि ज्यांना ते नको आहे ते बरोबर असणार नाहीत. जे येतील त्यांच्याबरोबर, जे येणार नाहीत त्यांच्या शिवाय असे सांगत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला इशारा दिला खरा. पण असे करताना युतीसाठी दार किती दिवस उघडे राहील, याचाही अंदाज प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिला. अद्याप कोणताही प्रस्ताव आला नाही. त्यामुळे चर्चा सुरू नाही. चर्चेसाठीचा हा कालावधी अगदी उमेदवारी मागे घेण्याच्या दिवसापर्यंत असू शकतो, असेही दानवे म्हणाले. त्यामुळे युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच राहील.

प्रचाराचे तंत्र आक्रमकच

२०१४ प्रमाणेच भाजप प्रचाराचे तंत्र आक्रमक असेल असे संकेत प्रचार कार्यसमितीच्या बैठकी दरम्यान मिळत होते. जालना शहरात नेत्यांची मोठी छायाचित्रे फलकावर, चौकाचौकात झेंडे, असा माहोल तयार करताना भाजपचे प्रचारगीतही मंगळवारी कार्यकर्त्यांसमोर सादर करण्यात आले. प्रचाराचे तंत्र पुढे डिजिटल होत जाणार असल्याचे कार्यकर्तेही सांगतात. पण प्रचार आक्रमकच असेल, असेच मंगळवारच्या बैठकीत दिसून आले. ही आक्रमकता कृषी प्रश्नावर किती टिकेल, याचा अंदाज भाजपच्या नेत्यांकडून घेतला जात आहे.

Story img Loader