दुष्काळी स्थितीत पाणी, चारा व पीककर्जासह इतर मागण्यांसाठी सामूहिक आत्महत्या करण्यासाठी प्रशासनाकडे परवानगी मागणाऱ्या माजलगाव तालुक्यातील गंगामसला ग्रामस्थांची पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी प्रशासकीय यंत्रणेसह गुरुवारी दुपारी भेट घेतली. सरकार तुमच्या पाठीशी आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेऐवजी हैदराबाद बँकेला गाव दत्तक देण्याबाबत निर्णय घेऊ. या बरोबरच खासदार निधीतून गावाला १० लाख रुपये निधी व इतर गावकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवले जातील, अशी ग्वाही देऊन ग्रामस्थांचे मतपरिवर्तन केल्यानंतर गावकऱ्यांनी सामूहिक आत्महत्येचा निर्णय मागे घेतल्याचे सांगितले.
गंगामसला हे ५ हजार लोकवस्तीचे गाव गोदावरी काठावर असले, तरी दुष्काळी स्थितीत येथील शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रशासकीय यंत्रणा दखल घेत नसल्यामुळे १५ ऑगस्टला ग्रामसभा घेऊन काही नागरिकांनी हाताला काम, प्यायला पाणी व पीककर्ज मिळावे अन्यथा प्रशासनाने सामूहिक आत्महत्येस परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, १५ दिवस लोटले तरी यंत्रणेने दखल न घेतल्याचे वृत्त मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर प्रसिद्ध झाले. मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील छावणीला भेट देऊन परभणी जिल्ह्यातील ढालेगावकडे जात असताना वाटेत असलेल्या गंगामसला गावातील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने रस्त्यावर जमले होते. पोलीस बंदोबस्तही तैनात होता. मुख्यमंत्री थांबतील ही अपेक्षा होती. मात्र, ताफा निघून गेल्यानंतर दुपारी एक वाजता पालकमंत्री मुंडे, आमदार आर. टी. देशमुख, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांच्यासह अधिकारी गावात दाखल झाले. मंत्री मुंडे यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली.
सामूहिक आत्महत्येचा निर्णय मागे
खासदार निधीतून गावाला १० लाख रुपये निधी व इतर गावकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवले जातील, अशी ग्वाही देऊन ग्रामस्थांचे मतपरिवर्तन केल्यानंतर गावकऱ्यांनी सामूहिक आत्महत्येचा निर्णय मागे घेतल्याचे सांगितले.
Written by बबन मिंडे
First published on: 04-09-2015 at 01:40 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cancel of gang suicide of village