छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी ४९४ किलो वजनाची गांजाची झाडे पकडण्यात आली असून, त्याची किंमत एक कोटी रुपये आहे. या प्रकरणी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला. लामकाना येथे दोन ठिकाणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक भारत निकाळजे यांनी दिली.
लामकाना येथील गट क्रमांक १८५ व गट क्रमांक ११३ येथील शेतातील तूर व कापसाच्या पिकात गांजाची रोपे लावण्यात आली होती. या संदर्भातील माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरन कमलअली चांद शहा आणि चंद्रकांत रघुनाथ बारबैले यांच्या शेतात ठापा टाकण्यात आला. त्यात एका शेतात गांजाची ९४ झाडे तर दुसरीकडे ८२ झाडे होती. चाँद यांच्या शेतातून २५४ किलो म्हणजे ५० लाख ८२ हजार किमत असलेली तर २४१ किलो गांजा बारबैले यांच्या शेतातून जप्त करण्यात आला. त्याची किंमत ४८ लाख २५ हजार रुपये असून, कमलअली चाँद शहा याला अटक करण्यात आली आहे. चंद्रकांत बारबैले हा पसार झाला.