महापालिका आयुक्त राहुल रेखावार यांनी शहर कॅरीबॅगमुक्त व स्वच्छता अभियान मोहिमेत सहभाग नोंदवण्याच्या केलेल्या आवाहनानुसार व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून मोठय़ा संख्येने सहभाग नोंदवला. या मोहिमेच्या उद्घाटनासाठी जिल्हाधिकरी राहुल रंजन महिवाल उपस्थित होते.
शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या शिवाजी चौकातून स्वच्छता मोहिमेस सुरुवात झाली. काही ठिकाणी सार्वजनिक नाल्यावर स्लॅब टाकण्यात आले. त्यामुळे नाला साफ करण्यास अडचणी येत होत्या. त्या दूर करण्यासाठी जेसीबीने स्लॅब उखडून टाकण्यात आले. शिवाजी चौकापासून सुरू झालेल्या मोहिमेत जिल्हाधिकारी महिवाल यांच्यासह व्यापारी व महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी झाडू हातात घेतला. गुरुवारी आयोजित मोहिमेत जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुंबरे, महापौर संगीता वडकर, आयुक्त राहुल रेखावार, उपमहापौर भगवान वाघमारे, उपायुक्त रणजित पाटील, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांत हाके, कार्याध्यक्ष नितीन वट्टमवार, सचिव सचिन अंबीलवादे, केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्टचे अध्यक्ष संजय मंत्री, मनपा विरोधी पक्षनेत्या अंबिका डहाळे, सभापती सुनील देशमुख, सुशीला नर्सीकर आदी सहभागी झाले होते.
महिवाल यांनी व्यापाऱ्यांनी स्वतहून स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात केल्यामुळे त्यांचे अभिनंदन केले व शहरातील नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त सर्व नगरसेवक व व्यापारी यांनी स्वच्छता मोहीम सुरू केल्याबद्दल महापौर वडकर यांनी आभार मानले. स्वच्छता ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. व्यापाऱ्यांनी हे शहर कॅरीबॅगमुक्त करावे, असे आवाहन वाघमारे यांनी केले. आयुक्त रेखावार यांनी कालच केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट यांची बठक घेऊन शहर कॅरीबॅगमुक्त करण्याचे आवाहन केले होते. या वेळी केमिस्टच्या सदस्यांनी शहर कॅरीबॅगमुक्त करण्याची शपथ घेतली. शहरातील मुख्य बाजारपेठ दुपापर्यंत बंद होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा