छत्रपती संभाजीनगर – जालन्यातील राजूर रोडवरील बिअरबार परमिट रुममध्ये अनधिकृत वीज वापर होत असताना गुन्हा दाखल न करता कोटेशन देऊन वीज सुरू करण्यासाठी ५० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यासह कंत्राटी लाईन हेल्पर व एक खासगी व्यक्ती छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले.
हेही वाचा >>> “सर्व नाभिक आणि मराठा समाजाला…”, ‘त्या’ वक्तव्यावरून छगन भुजबळांचं स्पष्टीकरण
याप्रकरणी तिघांविरुद्ध सोमवारी सायंकाळपर्यंत जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. गणेशसिंग बबनसिंग बायस (वय २८), विष्णू धोंडिबा दांडगे व भूषण अशोक वैलकर (३२), अशी लाच मागणाऱ्यांची नावे आहेत. गणेशसिंग बायस हा महावितरणच्या जालन्यातील कन्हैय्यानगर कार्यालयात कनिष्ठ अभियंता आहे. विष्णू धोंडगे हा कंत्राटी हेल्पर आहे. तर भूषण हा खासगी व्यक्ती आहे. तक्रारदाराने छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्याने ५ फेब्रुवारी रोजी पडताळणी करून पोलीस निरीक्षक अमोल धस यांच्या पथकाने कन्हैय्यानगर येथे सापळा रचून भूषण वैलकर याला बायस व धोंडगे यांच्या सांगण्यावरून ५० हजार रुपये घेताना पंचासमक्ष पकडण्यात आले.