छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात तिरमले समाजाच्या एका इसमाने प्रेमविवाह केल्याने जात पंचायतीने त्याच्यावर अडीच लाख रुपयांचा दंड लादला. त्याने तो दंड न भरल्यामुळे त्याची सून आणि नातू यांना सात पिढ्यांपर्यंत जातीतून बहिष्कृत करण्याचा निर्णय तिरमले जात पंचायतीने घेतला आहे. याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आष्टी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या तक्रारीनुसार, नरसू फुलमाळी यांनी काही दिवसांपूर्वी प्रेमविवाह केला. त्यासाठी त्यांनी जात पंचायतीची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे पंचायतीने त्यांच्यावर अडीच लाखांचा दंड ठोठावला. मात्र, ती रक्कम त्यांनी भरली नाही. त्यामुळे ती रक्कम तुम्ही भरा असा आदेश जात पंचायतीमधील पंच गंगाधर बाबू पालवे, उत्तम हरिभाऊ फुलमाळी, गंगा गंगाराम फुलमाळी, चिन्नू साहेबराव फुलमाळी, सुभाष फुलमाळी, बाबूराव साहेबराव फुलमाळी शेटीबा रामा काकडे, सयाजी सायबा फुलमाळी, गुलाब पालवे या नऊ जणांनी नरसू फुलमाळी यांची सून मालन शिवाजी फुलमाळी यांना दिला. दंड भरला नाही तर मालन व त्यांच्या मुलांना जातीतून बहिष्कृत करण्यात येईल, असे सांगण्यात आले. तेवढी रक्कम नाही, अशी विनंती केली असता रक्कम न भरल्यास सात पिढ्यांना बहिष्कृत केले जाईल असे त्यांना सुनावण्यात आले. जात पंचायतीच्या या निकालावर आक्षेप घेत मालन शिवाजी फुलमाळी यांनी आष्टी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार नऊ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही जात पंचायत आष्टी तालुक्यातील डाईठाण येथील तिरमली वस्तीत २२ सप्टेंबर रोजी सकाळी आयोजित करण्यात आली होती. जात पंचायतीमध्ये या समाजातील अनेक जण उपस्थित होते, असे मालन फुलमाळी यांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>‘लाडक्या बहिणीं’चे भाजपकडून तीन हजार मेळावे

‘पीटीआय’च्या वृत्तानुसार, याप्रकरणी पोलिसांनी ‘महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण (प्रतिबंध, बंदी व निवारण) अधिनियम, २०१६’च्या कलमाअंतर्गत तसेच ‘भारतीय न्याय संहिते’च्या (बीएनएस) काही कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही असे आष्टी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मालन फुलमाळी यांनी तिरमल जात पंचायतीच्या जाचाविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. मालन फुलमाळी यांच्या सासऱ्याने प्रेमविवाह केला म्हणून त्यांना शिक्षा देण्याचा प्रकार या घटनेतून समोर आला आहे.

बहिष्काराचे स्वरूप

तिरमले जातीतील बहुतांश लोक हे नंदीवाले म्हणून ओळखले जातात. विवाह प्रसंगी कपाळाला टिळा लावणे व फेटा न बांधण्यापासून विवाहसंबंध न होऊ देणे अशा बाबींचा बहिष्कारामध्ये समावेश असतो.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Caste panchayat investigates woman for love marriage with father in law in chhatrapati sambhajinagar amy