उस्मानाबाद तालुक्यातील आळणीत पथक दाखल होताच शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. तेच अधिकारी, पुन्हा त्याच जागेवर पाहणीसाठी आले, मात्र पदरात मदत नाही. त्यामुळे शेतकरी अधिक संतप्त झाले होते. पथकातील प्रमुख अधिकाऱ्याला शेतकऱ्यांनी ओढले. जिल्हाधिकाऱ्यांशी वादावादी झाली. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे गाडीत बसूनच पथकाने निवेदन स्वीकारले आणि दहा मिनिटांत दुसऱ्या ठिकाणाकडे कुच केली. एकूण तिसऱ्यांदा आलेल्या केंद्रीय पथकावर दंगल नियंत्रक पथक आणि पोलीस बंदोबस्तात दुष्काळाची पाहणी करण्याची वेळ आली.
आधी दोन वेळा आलात. फोटो काढून हात हलवत परत गेलात. आता तिसऱ्यांदा पाहणी केल्यानंतर तर मदत देणार की नाही, असा सवाल उपस्थित करीत उस्मानाबाद तालुक्यातील आळणी येथे शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाला घेराव घातला. आक्रमक झालेल्या ग्रामस्थांना दूर करण्यासाठी शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. तिसऱ्यांदा पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकाला ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शनिवारी सकाळी साडेबारा वाजता केंद्रीय पथक जिल्ह्यात दाखल झाले. उस्मानाबाद तालुक्यातील आळणी येथे पथक दाखल होताच संतप्त शेतकऱ्यांनी पथकाला घेराव घातला. यापूर्वी दोनवेळा पाहणी करून आमच्या पदरात काय पडले? यावेळीही नुसते फोटो काढून हात हलवत परत जाल. नेमकी आम्हाला काय मदत करणार आहात ते आताच सांगा, असा आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी उपसरपंच जयसिंग वीर, माजी उपसरपंच प्रशांत वीर, प्रसाद वीर, धनंजय वीर व अन्य ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी पथकातील अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागल्यानंतर थोडे सावरून घेत १० मिनिटांच्या पाहणीनंतर पथक ढोकीच्या दिशेने रवाना झाले. ढोकी येथे ज्वारीच्या पिकाची पाहणी करून पुन्हा एकदा जलयुक्त शिवारातील कामांचा या पथकाने केवळ पाच मिनिटांत आढावा घेतला. त्यानंतर भूम तालुक्यातील हाडोंग्रीच्या दिशेने हे पथक रवाना झाले. हाडोंग्री येथील जनावरांच्या चारा छावणीला या पथकाने भेट देऊन पशुपालकांशी संवाद साधला. जनावरांना किती चारा मिळतो, कशाप्रकारे चारा दिला जातो, असा पंधरा मिनिटांचा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम संपल्यानंतर भूम तालुक्यातील खव्याचा आस्वाद घेऊन पथक वाशी तालुक्यातील पारगावकडे मार्गस्थ झाले. या पथकातील सदस्य डॉ. एस. के. मल्होत्रा व डॉ. आर. पी. सिंग यांच्यासमवेत जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, धनंजय िशगाडे आदींची उपस्थिती होती.
प्रशासकीय अधिकाऱ्यांचे निलंबन करा – आमदार मोटे
जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता जीवघेणी आहे. त्याकडे डोळेझाक करीत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केंद्रीय पथकाचा दौरा सोयीनुसार आखला आहे. त्याचत्याच गावात पथक तिसऱ्यांदा पाहणी करीत आहे. केंद्रीय पथकाला पुन्हा-पुन्हा तीच गावे दाखविल्यामुळे मिळणाऱ्या मदतीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दौऱ्याचे नियोजन व्यवस्थित न करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार राहुल मोटे यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा