छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील ४२ तालुक्यांत दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, केंद्र सरकारचे पथक १३ ते १४ डिसेंबरदरम्यान दुष्काळपाहणी करणार आहे. दुष्काळाचा फटका बसलेल्या १५ जिल्ह्यांपैकी ८ जिल्ह्यांतील स्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा पथकाचा विचार आहे. पथकाचे नेतृत्व कृषी विभागाच्या केंद्रीय सचिव प्रिया रंजन करणार आहेत. पथकात निती आयोगाचे सदस्य आणि केंद्रातील विविध विभागांतील प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> वेरुळ परदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ; रस्त्यासह सुविधांच्या अभावामुळे अजिंठा लेण्यांना कमी प्रतिसाद 

राज्यात पावसाच्या खंडामुळे मूग, उडीद ही पिके घेताच आली नाहीत, तर कापसाची वाढ होऊ शकली नाही. काही तालुक्यांत उत्पादकतेमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक फरक पडला. छत्रपती संभाजीनगर, जालनासारख्या जिल्ह्यात मका पीक पूर्णत: वाळले. अनेक भागांत नोव्हेंबरमध्ये पिण्याच्या पाण्याचा टँकरने पुरवठा करावा लागला. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागांत जनावरांच्या चाऱ्याचे प्रश्नही गंभीर बनतील, असे चित्र आहे. त्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती निधीतून मदत करावी, असा प्रस्ताव राज्य सरकारने पाठवला आहे. त्याची तपासणी करण्यासाठी केंद्रीय पथक १२ डिसेंबरला पुण्यात येणार आहे. या पथकासमोर राज्यातील पीक पाण्यासह दुष्काळामुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्यांचे सादरीकरण होणार आहे. त्यानंतर १३ व १४ डिसेंबर या कालावधीमध्ये १२ जणांचे पथक पाहणी करणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडबरोबरच धाराशिव, पुणे, सोलापूर आणि नाशिक, जळगाव या जिल्ह्यांत पथक पाहणी करणार आहे.

निधीवाटपाआधी पडताळणी दुष्काळनिवारणासाठी राष्ट्रीय आपत्ती निधीतून २,२६१ कोटींची मदत मिळावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. या मागणीच्या अनुषंगाने केंद्रीय पथक पडताळणी करणार आहे. पावसाचा खंड, घटलेली उत्पादकता, पिण्याच्या पाण्याचे, जनावरांच्या चाऱ्यांचे प्रश्न या पथकासमारे मांडण्यात येतील.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central team to monitor drought in eight districts of maharashtra zws