एकनाथ शिंदे शिवसेनेच्या ४० बंडखोर आमदारांसोबत गुवाहाटीमध्ये ठाण मांडून आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार संकटात आल्याचे म्हटले जात असून शिवसेनेने बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबायला सुरुवात केली आहे. असे असतानाच आता शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी या बंडखोरीवर भाष्य केलं आहे. त्यांनी शिवसेनेचे ताकद संपलेली नसून आम्ही पुन्हा एकदा उभे राहू असे चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत. तसेच हे बंड जास्त दिवस चालणार नाही, असा विश्वासही खैरे यांनी व्यक्त केलाय.

हेही वाचा >>> नरहरी झिरवळ यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव अवैध? शिवसेनेच्या वकिलांनी सांगितली कायदेशीर बाजू, म्हणाले…

“शिवसेनेची ताकद संपलेली नसून संघटन मजबूत करण्यामध्ये शिवसेना कधीच मागे राहिलेली नाही. काही लोक गेले तर शिवसेनेला काहीच फरक पडणार नाही. शिवसेनेचे संघटन हे खूप मोठे असून शिवसैनिक शिवसेनेसोबत एकनिष्ठ आहेत. जिल्ह्यातील काही आमदारांनी बंडखोरी केली. मात्र अजूनही त्यांच्याकडे परत येण्याची वेळ आहे. जर ते परत आले नाही तर मतदार त्यांना कधीच माफ करणार नाहीत,” असे खैरे म्हणाले.

हेही वाचा >>> पक्षांतर करणाऱ्यांना पराभूत करण्याची परंपरा विदर्भातही, शिंदेंसोबत गेलेल्या पाच आमदारांच्या राजकीय भवितव्याबाबत चिंता

तसेच, “शिवसेनेचा आक्रमकपणा गेला असं कोणीही समजू नये. शिवसेनाही आक्रमक असून वेळ आल्यास शिवसैनिक त्यांचा आक्रमकपणाही दाखवतील. शिवसेना ही मराठी माणसासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केली होती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला व्यवस्थितपणे उभे केले आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी चुकीचे कारण देऊन शिवसेनेविरोधात बंडखोरी पुकारली आहे. हे बंड जास्त दिवस राहणार नाही. कारण मतदारांना पुन्हा एकदा या सर्व बंडखोरांना तोंड दाखवावे लागणार आहे,” असा दावा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

Story img Loader