परतीच्या पावसामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांचे मोठे आहे. हाताशी आलेले सोयाबीन, कापूस पावसामुळे ओले झाले आहे. याच कारणामुळे राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अशी मागणी केली जात आहे. आज (२३ ऑक्टोबर) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. ठाकरेंच्या या दौऱ्यावर शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी टीका केली आहे. ठाकरेंचा दौरा फक्त २४ मिनिटांचा आहे, असे ते म्हणाले आहेत. दरम्यान सत्तारांच्या याच टीकेला ठाकरे गटातील नेते चंद्रकांत खौरे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. सत्तार यांची सगळी लफडी आमच्याकडे आहेत. आम्ही त्यांचा बंदोबस्त करतो, असे खैरे म्हणाले आहेत.

हेही वाचा >> “उद्धव ठाकरे २४ मिनिटे शेतकऱ्यांची विचारपूस करणार, आता यावेळेत ते…”; अब्दुल सत्तारांनी साधला निशाणा!

“शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्याचे काम हे सत्ताधाऱ्यांचे आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर फिरावे. तुम्ही ५० खोके आमदारांना देता. मग शेतकऱ्यांना एखादी पेटीतरी द्या. शेतकऱ्यांना काहीही मदत मिळालेली नाही. सगळे आपापल्या धुंदीत आहेत. याच कारणामुळे उद्धव ठाकरे बाहेर पडले आहेत,” अशी घणाघाती टीका चंद्रकांत खैरे यांनी केली.

सत्तार यांची सगळी लफडी आमच्याकडे

“त्यांच्या (उद्धव ठाकरे) हाताखाली तुम्ही (अब्दुल सत्तार) काम केलेलं आहे. तुम्ही त्यांच्यामुळेच निवडून आलेले आहात, हे विसरू नका. तुम्ही माझ्या पाया पडले, त्यांच्या पाया पडले. मला कसंही करून निवडून आणा. खैरे साहेबांना बरोबर घ्या, असे सत्तार म्हणाले होते. मी गेलो म्हणून ते निवडून आले. पण आता त्यांना मस्ती आली आहे. ते सगळीकडे फिरत असतात. कधी इकडे, कधी तिकडे. आता आजून कोणत्या पक्षात जातील सांगता येत नाही. त्यामुळे त्यानी थोडं थांबावं. आम्ही करतो त्यांचा बंदोबस्त. त्यांची अनेक लफडी माझ्याकडे आली आहेत. अब्दुल सत्तारसारखा माणूस उद्धव ठाकरेंवर टीका करतो. त्यांना हे कळत नाही, की आपण उद्धव ठाकरेंच्या हाताखाली काम केले आहे. त्याचा समाचार आम्ही घेऊ,” अशी कठोर टीका खैरे यांनी केली.

हेही वाचा >> एकनाथ शिंदेंची भेट घेताच दीपाली सय्यद यांची ठाकरेंवर टीका? आता किशोरी पेडणेकर यांचेही जशास तसे उत्तर; म्हणाल्या…

उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्याविषयीही खैरे यांनी अधिक माहिती दिली. “उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या काही भागाला भेट देणार आहेत. ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडेलला आहे, जेथे लोकांचे नुकसान झालेले आहे, तिथे ते विशेषत: जाणार आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, त्याची माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेली आहे. त्यासंबंधीची कागपदत्रे त्यांना देण्यात आली आहेत. आमचे आमदार, विरोधी पक्षनेते आपापल्या भागात फिरत आहेत,” असे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

हेही वाचा >> दीपाली सय्यद नाराज आहेत? शिंदे गटात जाणार का? दिली सर्व प्रश्नांची उत्तरं, म्हणाल्या “माझी कोणावरही…”

अब्दुल सत्तार काय म्हणाले?

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावर टीका केली आहे. मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, “मी त्यांच्या दौऱ्यातील मिनीट टू मिनीट कार्यक्रम पाहिला त्यानंतर असं दिसून आलं की २४ मिनिटांसाठी ते शेतकऱ्यांची विचारपूस करणार आहेत. आता यावेळेत ते किती पाहातील, काय पाहातील, किती ओला दुष्काळ पाहातील.”

Story img Loader