सुहास सरदेशमुख
औरंगाबाद : राज्यातील कोणत्याही धान्य बाजारात महिला आढळत नाहीत, कारण नाहक हे क्षेत्र पुरुषांचे मानले गेले आहे. बाजार समित्यांमध्ये निर्णयांचे अधिकार पुरुष केंद्रितच असतात, पण हे चित्र बदलण्याची सुरुवात आता मराठवाड्यातून झाली आहे.
औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील १०० महिलांनी या क्षेत्रात दमदार पाऊल टाकले आहे. बाजार समितीमध्ये ठोक मालाची विक्री होते, पण तोच दर जर गावातल्या गावातच मिळाला तर वाहतुकीचा खर्च वाचू शकतो, अशी शक्कल लढवत औरंगाबाद येथील सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या कार्यकर्त्यांनी धान्य खरेदीसाठी गुणवत्ता तपासणी, धान्य दर ठरविण्याचा अभ्यास याचे प्रशिक्षण महिलांना दिले. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांत या महिलांनी धान्य बाजारात दोन हजार ७९२ व्यवहारांतून सुमारे सहा कोटी रुपयांची उलाढाल केली आहे.
महिला शेतकरी गटांच्या माध्यमातून औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात धान्य खरेदीची १० केंद्रे पहिल्या टप्प्यात सुरू करण्याचे नियोजन सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले होते. त्यातील पाच केंद्रे पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत. या प्रयोगाविषयी बोलातना कार्यवाह सुहास आजगावकर म्हणाले, ‘‘बाजार समितीमध्ये मालाचे ठोक व्यवहार होतात. जेव्हा ही खरेदी-विक्री होते तेव्हा शेतकऱ्यांना धान्याचा त्या दिवशीचा दर माहीत असतोच असे नाही. पण गावस्तरावरील या केंद्रापर्यंत दिवसभराच्या खरेदीचा दर कळविला जातो. हा दर कमी धान्यविक्रीसाठी न्यायचे असेल तर शेतकऱ्यांना परवडत नाही. अशा व्यक्ती गावातच धान्यविक्री करतात. त्यामुळे त्यांचा वाहतूक खर्च वाचतो.’’
ग्रामीण भागात आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या या संस्थेमार्फत महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना वजन काटे आणि धान्यातील आर्द्रता मोजण्याचे यंत्रही देण्यात आले. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या धान्याचा दर ठरविता येणे सुलभ झाले आहे. धान्य खरेदी करताना त्यात काडी-कचरा किती? धान्याचा दर्जा कसा? यावर दर ठरतात. ज्या महिलांमार्फत खरेदी होते त्यांना ‘कमिशन’ देण्याची पद्धत विकसित करण्यात आली असून जालना जिल्ह्यातील मात्रेवाडी गावातील काशीबाई शिवाजी पवार यांनी आतापर्यंत सर्वाधिक व्यवहार करून हजारो रुपयांचे कमिशनही मिळविले आहे.
वाघलगावच्या चंद्रभागा काकडे या देखील आता धान्य बाजारात पाय रोऊन उभ्या राहिल्या आहेत. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात २० जणींनी जम बसविला आहे, तर १०० जणी या क्षेत्रात भविष्य घडवू पाहत आहेत.
शेतकऱ्यांना लाभदायक…
एखाद्या शेतकऱ्याला ५० किलोच धान्य विकायचे असेल, तर त्याला गावाकडून ते बाजार समितीपर्यंत आणणे परवडत नाही. वाहतूक खर्च खूप होतो. त्यामुळे गावातच सुविधा असल्याने अनेक जण महिला शेतकरी गटाकडे धान्यविक्री करीत आहेत. बाजार समितीमधील दर सतत बदलत असतात. गावातील या खरेदी केंद्रावर दिवसाचा एकच दर ठरवून दिला जातो. धान्यविक्रीनंतर २४ तासांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात. त्यामुळे तातडीची निकड भागविण्यासाठी हा व्यवहार फायद्याचा ठरू लागला आहे.