छत्रपती संभाजीनगर : गनिमी कावा करून औरंगजेबची कबर उखडण्याची धमकी देऊन शहरात प्रवेश करणारे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना येथील पोलिसांनी रविवारी दुपारी क्रांती चौकात ताब्यात घेतले. चौघांवर शहर बंदीचे आदेश असताना प्रवेश केल्याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे मराठवाडा पदाधिकारी बाळराजे रामराव आवारे पाटील (रा. महाकाळ, ता. अंबड, जि. जालना) व जयश्री उंबरे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. हा वाद वाढत असताना उपजिल्हाधिकारी तसेच पोलिस उपायुक्तांनी शहर बंदीची नोटीस बजाविली आहे. त्यानंतरही २३ मार्च रोजी गोपनिय शाखेला बाळराजे आवारे पाटील व सहकारी शहराच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली होती. यामाहितीच्या आधारे क्रांतीचौक ठाण्याचे निरीक्षक सुनील माने, वेदांतनगर ठाण्यातील पोलिस निरीक्षक प्रविणा यादव, बेगमुपरा ठाण्याचे मंगेश जगताप यांनी क्रांती चौकात बंदोबस्त लावला होता.

दुपारी दीड वाजता (एमएच-१४-ईपी- ४) या वाहनातून आलेल्या बाळराजे आवारे पाटील व त्यांचे साथीदार प्रवीण श्यामराव डिकले (३६, रा. तांदुळवाडी, ता. कळंब), संदीप उत्तरेश्वर चाळक (२९,रा. केज, ता. बीड) आणि गणेश सर्जेराव पवार (३६, रा. महाकाळ, ता. अंबड, जि. जालना) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरुद्ध पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अशोक इंगोले करित आहेत.