छत्रपती संभाजीनगर :  मागच्या आठवड्यातच फारोळा फाटा येथे २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यासाठी खोदकाम करताना ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी निखळली. जलवाहिनी दुरुस्तीसाठी सहा दिवस लागले. रविवारी रात्री नऊशेच्या जलवाहिनीतून पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर २४ तासातच  फारोळा फाटयावरच नऊशेची जलवाहिनी पुन्हा निखळली. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा संकटात आला आहे.

मार्च महिन्यात शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला. सातशे, बाराशे आणि नऊशेची जलवाहिनी एकापाठोपाठ एक याप्रमाणे फुटल्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्याचे तिनतेरा वाजले. पाण्याचा खंड बारा ते पंधरा दिवसावर पोहचल्यामुळे नागरिक संतप्त झाले. पाण्यासाठी ओरड सुरू झाली. मनपा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यात समन्वय नसल्यामुळेच शहरातील नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप होत आहे. या प्रश्नावर आता एकही नेता बोलण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.  

२५ मार्च रोजी फारोळा फाटा येथे २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यासाठी खोदकाम करताना नऊशेची जलवाहिनी निळखली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने २५०० मिमीची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होईपर्यंत नऊशेची जलवाहिनीचे काम हाती घेतले नाही. सहा दिवसानी जलवाहिनीचे काम पूर्ण करून त्यातून पाणी पुरवठा सुरू केला. सोमवारी दिवसभर पाणी पुरवठा झाला. मंगळवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास नऊशेची जलवाहिनी पुन्हा निखळली. जलवाहिनी निखळल्याने शहराचा २० दशलक्ष लीटर  पाणी पुरवठा बंद झाला. त्यामुळे शहरावर पाणी पुरवठ्याचे संकट ओढावले आहे.