लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : फारोळा नाल्यामध्ये २५०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम करताना नऊशे व्यासाची जलवाहिनी निखळली. त्यामुळे पाणीपुरवठा बंद करावा लागला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी दोन दिवस लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. एका कामाची दुरुस्ती संपते न संपते तोच नवे काम निघाल्याने शहरात पुन्हा ‘पाणीबाणी’ निर्माण होण्याची शक्यता आहे.

जलवाहिनी दुरुस्तीसह विविध कामांसाठी महापालिकेने ३० तासांचा वेळ दुरुस्तीसाठी घेतला. त्यानंतर पुन्हा नव्या अडचणी आल्याने पाण्यासाठी ओरड होण्याची शक्यता आहे. नुकतीच जलवाहिनी दुरुस्तीची कामे करण्यात आली. त्यानंतर पहाटे शहराचा पाणीपुरवठा सुरू केला. सातशे, नऊशे आणि बाराशेच्या जलवाहिनीतून पाणी सुरू केल्यानंतर काही वेळातच नऊशेची जलवाहिनी निखळल्याचे समोर आले.

फारोळा जलशुद्धीकरण केंद्राजवळील नाल्यातून २५०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम केले जात आहे. त्यासाठी नाल्यामध्ये स्टॅँड बांधण्यासाठी जेसीबीच्या साह्याने खोदकाम करण्यात आले. या खोदकामाजवळून नऊशेची जलवाहिनी गेलेली आहे. पहाटे पाणी सुरू होताच पाण्याच्या दाबाने नऊशेची जलवाहिनी निखळली. जलवाहिनीतून पाणी खोदलेल्या खड्ड्यात जमा होऊन नाल्यातून वाहू लागले. अर्धातास झाला तरी जलवाहिनीतून पाणी आले का नाही याची तपासणी केली असता फारोळा नाल्यात जलवाहिनी निखळून पाणीाच पाणी झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या जलवाहिनीतून मिळणाऱ्या २० एमएलडी पाण्याचा फटका बसला आहे.

जलवाहिनी दुरुस्तीसाठी यंत्रणा व कामगार मिळेना

फारोळा नाल्यात निखळलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत केले जाणार आहे. परंतु, मजीप्राकडे ना यंत्रणा आहे, ना कुशल मनुष्यबळ. त्यामुळे जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी त्यांनाही मनपाच्या यंत्रणेसह कामगारांवर अवलंबून राहावे लागणार आहे. दोन दिवसरात्र मनपाने दुरुस्तीची कामे केली. आज सुटी असल्याने मनपाकडून पुन्हा मनुष्यबळ मागण्यात आले असून रविवारी ते दिले जाईल. तोपर्यंत पाणीबाणी कायम राहू शकेल असे सांगण्यात येते आहे.