छत्रपती संभाजीनगर : औद्योगिक विकास शहरात महाराष्ट्र प्रदूषण विकास मंडळाकडून उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या परवानगीसाठी नाहकच १५० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. अनेक उद्योगांच्या संचिका अधिकाऱ्यांनी अडवून धरल्या जातात अशी तक्रार केल्यानंतर या प्रश्नी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना मंत्री पियुष गोयल यांनी दूरध्वनी केला. एकूण प्रकल्पाला पर्यावरणाची मंजूरी असल्याने पुन्हा परवानगीसाठीचा कालावधी सात दिवसावर आणावा असे निर्देश गोयल यांनी दिले. त्यामुळे प्रदूषण मंडळाकडून मिळणाऱ्या परवानग्यांचा विषय केंद्रीय मंत्र्यांना सोडवावा लागला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली. ही गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना प्रदूषण मंडळाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठीचा कालावधी १५० दिवसांचा आहे. मात्र, एवढे दिवस कशासाठी लागतात ? कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक असल्याने ही प्रमाणपत्र लवकर मिळणे शक्य नाही का, असे प्रश्न उद्योजकांनी मंत्री पियुष गोयल यांच्यासमोर उपस्थित केले. या पूर्वी हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही मांडण्यात आला होता. तेव्हा ज्या कंपन्यांनी तक्रारी केल्या, त्याचे प्रश्न मार्गी लागले. मात्र, ज्यांची नावे मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आली नव्हती अशा अनेक उद्योगांना ना हरकत प्रमाणपत्र देताना पुन्हा दिरंगाई सुरू असल्याची तक्रार होती. प्रश्न समोर आल्यानंतर मंत्री पियुष गोयल यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंंडे व संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीकरुन अशी प्रमाणपत्रे देण्याचा कालावधी केवळ सात दिवसापर्यत आणण्याचे निर्देश दिले. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष पद शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहे. पर्यावरण मंत्री पद भाजपकडे असल्याने या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असल्याच्याही उद्योजकांच्या तक्रारी आहेत. यातील काही तक्रारींचा उहापोह पियुष गोयल यांच्याकडे करण्यात आला. या अनुषंगाने मंत्री पंकजा मुंडे यांनी लक्ष घालण्याचे निर्देश पियुष गाेयल यांनी दिले आहेत.

Story img Loader