छत्रपती संभाजीनगर – फुलंब्री येथील एका प्लॅस्टिक दुकानाला आग लागून उडालेल्या भडक्याने शटरजवळ उभ्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील एका खाजगी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी मध्यरात्री २ च्या सुमारास घडली.
आगीनंतर प्रचंड दाबाने उडालेल्या शटरमुळे स्फोटासारखा आवाज झाला असून त्याविषयी अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. मात्र, त्याबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी आगीत प्लॅस्टिकच्या वस्तू जळाल्याने गॅस तयार होऊन दाबातून शटर फेकले गेल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे सांगितले.
हेही वाचा – पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
राजू सलीम शेख (वय २५), गजानन दादाराव वाघ (२८) व नितीन रमेश नागरे (२०), अशी मृतांची नावे आहेत. तर शाहरूख सलीम शेख (२८) व अजय सुभाष नागरे (२३) हे दोघे जखमी आहेत. जखमी शाहरूखवर घाटीमध्ये तर अजय नागरे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगरमधील सिडको एन-९ येथील अग्निशमन विभागाकडून देण्यात आली. विभागाचे कर्तव्यावरील अधिकारी हरिश्चंद्र पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचवून घेऊन आग आटोक्यात आणली.
फुलंब्रीतील दरी फाटा सारा काॅलनीजवळ राजू स्टील ॲण्ड प्लास्टिक साहित्याचे मृत राजू सलीम शेख यांच्या मालकीचे दुकान होते. या दुकानातील आगीत दोन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज अग्निशमन विभागाने वर्तवला आहे. आग लागल्याचे कळताच मृत तिघे दुकानाच्या शटरजवळ येऊन उभे होते आणि त्याचदरम्यान आतील दाबाने शटर उडून फेकले गेले. त्यातच तिघांचा मृत्यू झाला. त्यातील नितीन नागरे व राजू शेख हे दोघे अविवाहित होते.
© The Indian Express (P) Ltd