छत्रपती संभाजीनगर – नारेगाव येथील जुना कचरा डेपोसमोरील भंगार गोदामाला लागलेली आग पसरत नजीकच्या पाच अन्य गोदामांपर्यंत जाऊन पोहोचली. ही घटना बुधवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा, पदमपुरा, एन-९, कांचनवाडी, सिडको, गरवारे टेंडर व महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत महामंडळाचे बंब रवाना झाले. आग तीन तासानंतर आटोक्यात आणण्यास यश आल्याची माहिती कर्तव्यावरील अधिकारी श्रीकृष्णा होळंबे यांनी दिली.
आग लागलेल्या गोदामांमध्ये एक भंगारचे, वाहन दुरुस्तीचे (गॅरेज), लाकडाचे वखार, कूलर तयार करण्याचे गोदाम व अन्य दोन, अशा सहा गोदामांचा समावेश असल्याचे होळंबे यांनी सांगितले. अमीर खान, नियाज अली अशफाक अली, हमीद खान यांच भंगार, लोखंड व ऑईलचे गोदाम, अशोक भालेराव यांचे प्लास्टिक पिशव्यांचे गोदाम, अशा गोदामांमधील वस्तुंची अक्षरश: राख झाली. आग एवढी मोठी होती की नारेगाव परिसरात प्रचंड धूर आणि लोळ पसरले होते. मुख्य अग्निशमन अधिकारी एस. के. भगत यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन केंद्र अधिकारी ए. एन. खांडेकर, होळंबे, रमेश सोनवणे, एल. पी. कोल्हे, विनायक कदम या कर्तव्य अधिकाऱ्यांच्या सुमारे २५ जणांच्या पथकाने आग आटोक्यात आणली.