छत्रपती संभाजीनगर : अजिंठा अर्बन बँकेतील ९७ कोटी ४१ लाखांच्या अपहार प्रकरणात अटक असलेले मुख्य आरोपी माजी आमदार तथा बँकेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष झांबड यांच्या पोलीस कोठडीत १८ फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. शर्मा यांनी बुधवारी दिले.

पोलीस कोठडीदरम्यान पोलिसांनी ३६ एफडीओडी कर्ज प्रकरण, बनावट बँक ठेव रक्कम, प्रमाणपत्र, गुन्ह्यातील इतर आरोपींचा सहभाग, बँकेतील ठेवीदारांचे एकूण ठेवी व त्या संदर्भातील अभिलेख याबाबींवर झांबडकडे चौकशी केली. मात्र, आरोपीने काही मुद्द्यांवर माहिती दिली तर काही मुद्द्यांवर उत्तर देण्यास टाळाटाळ करीत आहे. तसेच न्यायवैद्यक अंकेक्षणमध्ये नव्याने आढळून आलेल्या मुद्यांवरही पोलिसांनी आरोपीची चौकशी केली. मात्र, आरोपी त्यावर उडवा-उडवीची उत्तरे देत असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

आतापर्यंत केलेल्या तपासात, बँकेतील ठेवीदारांचे प्रत्यक्ष अनामती ४ अब्ज २५ कोटी ४९ लाख ७ हजार ७३ रुपये एवढे असून, त्यातील ३ अब्ज २३ कोटी ५६ लाख ५७ हजार २५४ रुपये एवढ्या ठेवीदारांना डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (डीआयसीजीसी) या संस्थेकडून परत मिळाले आहेत. तर उर्वरित ठेवीदारांची १ अब्ज ९२ कोटी ४९ लाख ८१९ रुपये एवढी रक्कम मिळणे बाकी असल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच आरोपींनी बनावट तयार केलेल्या ३६ ठेवीवर कर्ज घेतल्याप्रकरणात ४ खातेदार मृत असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. ६ खातेदारांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून, उर्वरित १३ खातेधारकांची माहिती मिळविण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच आरोपीचे स्वाक्षरीचे नमुने पोलिसांनी घेतले असून, त्याची घरझडती देखील पोलिसांनी घेतली आहे. आणखी बऱ्याच मुद्यांवर तपास करणे बाकी असल्याने आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती सहायक लोकाभियोक्ता बी. आर. लोया यांनी न्यायालयात केली.

Story img Loader