छत्रपती संभाजीनगर : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन मंडळांमध्ये गुलाल उधळण्यावरून झालेल्या वादानंतर पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी एका तरुणाला प्रकृती बिघडल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तो अत्यवस्थ असल्याचे बुधवारी दुपारी जाहीर करण्यात आले. यानंतर नातेवाईक, गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. माजी महापौर नंदकुमार घोडेले, काही वरिष्ठ पोलीस अधिकारीही रुग्णालयात दाखल झाले होते. तरुण प्रतीक राजू कुमावत (वय २१) हा न्यायालयातही न्यायाधीशांसमोरच चक्कर येऊन पडलेला असतानाही ‘तो काही मरणारंय का ?’ असे म्हणत पोलिसांनी चांगल्या दवाखान्यात उपचारार्थ नेण्यास आडकाठी आणल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे.

पोलिसांनी पोलीस कोठडीदरम्यान केलेला छळ, दोष नसताना आक्षेपार्ह बोलणे आपल्या उच्चशिक्षित मुलाला सहन झाले नाही आणि त्यातूनच त्याला मेंदूचा झटका आला. मुलाला खासगी दवाखान्यातही नेऊ दिले नाही. उपचाराला उशीर झाल्याने मुलाची प्रकृती अत्यवस्थ बनली आहे. मोलमजुरी करून आपण मुलाला शिकवले. एम.एसस्सी काॅम्प्युटर आणि पाच भाषांचे शिक्षण घेतलेल्या मुलाला दिवाळीनंतर चांगल्या पगाराची नोकरी लागणार होती. मात्र तो आता अत्यवस्थ असल्याचे डाॅक्टरांनी सांगितल्याने आपल्या भविष्याचा आधार कोसळल्यात जमा असून, याला पोलीस कारणीभूत असल्याचा आरोप करत या प्रकरणात न्याय मिळायला हवा, असे तरुण प्रतीक कुमावत याचे वडील राजू कुमावत यांनी माध्यमांसमोर सांगितले.

हेही वाचा : आंदोलने व कृषी मालाच्या दराचे प्रश्न नेत्यांवर सोडा…; मराठवाड्यातील ३० जागांवर महायुतीच्या विजयाचा अमित शहा यांचा दावा

पुंडलिकनगर येथील शंभू नगरातील हिंदू स्वराज नवयुवक गणेश मंडळ व जय योगेश्वर गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान गुलाल उधळण्यावरून वाद झाला होता. दोन गटांमध्ये दगडफेकही झाली होती. दोन्ही गटातील काही तरुणांना पुंडलिकनगर पोलिसांनी उचलून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. एका गटातील तरुणांमध्ये प्रतीक कुमावतही (वय २१) होता.

प्रतीकसोबतच्या काही तरुणांनी सांगितले की, आम्हा सोळा जणांना १८ सप्टेंबर रोजी पोलिसांनी माफिनामा लिहून घ्यायचा आहे असे म्हणून ताब्यात घेतले. तेथून आम्हाला घाटीत नेले. तेथे प्रतीकला चक्कर आली. मात्र, आैषधोपचार मिळण्यास सायंकाळ उजाडली. १९ सप्टेंबरला अटकेतील तरुणांना न्यायालयात उभे केले असता न्यायाधीशांसमोरच प्रतीक चक्कर येऊन कोसळला. सुरुवातीला पाच तरुणांना ताब्यात घेतले तेव्हा त्यांना मारहाण झाल्याचेही यावेळी सांगण्यात आले. प्रतीकचे वडील राजू कुमावत यांनी सांगितले की मुलाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी पोलिसांकडे आम्ही बरीच विनवणी केली. मात्र, त्यांनी तो काय मरणारंय का, असे म्हणून खासगी रुग्णालयात दाखल करण्यास विरोध केला. पोलिसांमुळेच आपला मुलगा अत्यवस्थ असल्याचा आरोप प्रतीकचे वडील राजू कुमावत यांनी केला.

हेही वाचा : लोकसभेतील अनपेक्षित निकालानंतर नाराजीची तीव्रता आता कमी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

पोलिसांनी कोणालाही धमकावले नाही. मारहाण केली नाही. पोलिसांवर आरोप होतच असतात.

कुंदन जाधव, पोलीस निरीक्षक.