छत्रपती संभाजीनगर – नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या कुटुंबाचे घर फोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख व १५ तोळे सोन्याचे दागिने, असा ऐवज पळवला. ही घटना २२ मार्च रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत गारखेडा परिसरातील काबरानगर भागात घडली.

या प्रकरणी विजेंद्र कचरू खरात यांनी दिलेल्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार २२ मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास विजेंद्र खरात हे घराला कुलूप लावून कुटुंबासह नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेले होते. अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून २ लाख २० हजार रुपये रोख, १ लाख २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे नेकलेस, ७० हजार रुपये किंमतीचे मिनी गंठण, ९० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे नेकलेस, २० हजार रुपये किंमतीचे कानातले झुंबर, ६० हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या असा ७ लाख ७ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला.