Ladki Bahin Scheme: महायुती सराकरने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केल्यापासून आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरला आहे. महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद पाहता आणि अर्ज भरण्यास अडचणी येत असल्यामुळे राज्य सरकारने या योजनेला सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी राज्य सरकारने जुलै महिन्यात अर्ज केलेल्या ८० लाख महिलांच्या खात्यात पैसे पाठविले आहेत. महिलांच्या खात्यात पैसे येत असल्याचे पाहून आता काही पुरूषांनीही महिलांचा फोटो वापरून स्वतःच्या बँक खात्याची माहिती देत अर्ज भरल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात हा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले असून याची चौकशी सुरू आहे.
नेमका प्रकार काय?
लाडकी बहीण योजनेत २१ ते ४५ वयोगटातील दुर्बल घटातून येणाऱ्या महिलांना प्रति महिना दीड हजार रुपयांची मदत दिली जात आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरले जात आहेत. या संधीचा फायदा घेऊन कन्नड तालुक्यातील १२ पुरुषांनी महिलांचे फोटो वापरून अर्ज भरले आहेत. सोशल मीडियावर आजवर पुरुष महिलांच्या नावाने अकाऊंट उघडून फसवणूक करत असल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. मात्र महिलांचे फोटो वापरून थेट सरकारलाच गंडविण्याचा हा धक्कादायक प्रकार कन्नड तालुक्यात घडला आहे.
कसे लक्षात आले?
कन्नड तालुक्यात लाडकी बहीण योजनेसाठी ९२ हजाराहून अधिक अर्ज आले आहेत. या अर्जांची छाननी करत असताना महिला व बालकल्याण विभागाच्या निदर्शनास सदर बाब आली. १२ जणांनी अर्ज सादर करताना महिलेचा फोटो वापरला असला तरी कागदपत्र मात्र स्वतःचीच जमा केली आहेत. यामध्ये आधार कार्ड, हमीपत्र आणि बँक खात्याची माहितीही अर्जदारांनी स्वतःच्या नावाने भरली आहे. या प्रकारानंतर आता या १२ भावांवर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सातार जिल्ह्यातील एका व्यक्तीने ३० जणांच्या आधार कार्डचा गैरवापर करून तब्बल ३० अर्ज भरले असल्याचे समोर आले होते. धक्कादायक म्हणजे यापैकी २६ खात्यांत पैसेही जमा झाले होते. पनवेलमधील एका महिलेचा अर्ज स्वीकारला जात नव्हता. तेव्हा तिच्या आधार क्रमाकांचा कुणीतरी आधीच वापर केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सखोल चौकशी केली असता हा घोटाळा उघड झाला होता.
‘लाडकी बहीण’ योजनेत सुमारे २ कोटी लाभार्थींना दरमहा दीड हजार रुपये गृहीत धरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात वर्षाला ४६ हजार कोटींची तरतूद केली आहे.