सुहास सरदेशमुख, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्रपती संभाजीनगर : खरकी, खडकी, खुजिस्ताबुनियाद, फतेहनगर, औरंगाबाद, संभाजीनगर, असा नामांतरचा ऐतिहासिक प्रवास करत वाढणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा सध्याचा विकास दर १२.६० टक्के. २०२८ पर्यंत राज्याची उलाढाल जर एक लाख कोटी करायची असेल तर हा विकास दर २५ टक्क्यांवर नेण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. त्यासाठी वाहन, औषधे, बिअर, उद्योगात अग्रेसर असणाऱ्या शहरातील उद्योजकांनी ‘ड्रोन’ उद्योग विकसित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र शक्तिस्थळे तेवढा शक्तिपात अशी विसंगतीही जिल्ह्यात दिसून येते. त्यामुळेच हा जिल्हा विकसित जिल्ह्याच्या रांगेत अजूनही मागेच राहिला आहे.

 मुंबईनंतर पुणे, नाशिक, नागपूर या विभागाची विकास बरोबरी करण्यासाठी पर्यटनांस प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांची आवश्यकता असल्याचे नियोजन केले जात आहे. मात्र, कामातील दिरंगाई आणि बदलत जाणाऱ्या प्राधान्यक्रमामुळे जिल्ह्याच्या विकास वेगाची गती मंदावते, असे दिसून आले आहे.

हेही वाचा >>> दीड वर्षांत २४ हजार पोलीस भरती; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी

मराठवाडयातील अन्य जिल्ह्याच्या तुलनेत ऐतिहासिक राजधानीचे शहर असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जागतिक दर्जाचे अजिंठा व वेरुळची लेणी आहे. देवगिरीचा किल्ला, बीबी का मकबरासह अनेक पर्यटनस्थळे आहेत. पण या पर्यटनस्थळांची माहिती जगभर पोहोचणारी यंत्रणाच नाही.  गेल्या वर्षी टूर ऑपटेरच्या वार्षिक अधिवेशनानंतर वेरुळ अणि अजिंठा येथील लेणी परिसरात विदेशी बनावटीचे स्वच्छतागृहांची सोय नाही. बस, पर्यटन स्थळे, अभ्यागत केंद्र या सर्वांना जाताना वेगवेगळी तिकिटे घ्यावी लागतात, अशा साध्या बाबी पूर्ण झालेल्या नाहीत. 

उद्योजकांसाठी दहा हजार एकरावर उभारलेल्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग उभारणीचा दर तसा वाढता असला तरी त्याचा वेग कमीच आहे. साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक आणि साडेपाच हजारच रोजगार अशी विसंगतीही विकासात दिसून येते. बजाजने दुचाकीचा उद्योग सुरू केल्यानंतर औरंगाबादचे रुपडे बदलू लागले. पण उलाढालीचा वेग वाढविण्यासाठी शहरी आणि ग्रामीण विकासाचा समन्वय साधणे आवश्यक असल्याचे मानले जात आहे. समृद्धी महामार्गामुळे उलाढालीचा वेग वाढण्याची शक्यता अधिक आहे.

जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावण्यासाठी आता २ हजार २०० एकरावर तुतीची लागवड करून रेशीम उद्योग वाढविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. पैठणची पैठणी पण मुख्य विक्रीचे ठिकाण येवला. हे चित्र बदलण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. पण त्याचा वेग मात्र तसा कमीच. मका, कापूस उत्पादनात पुढाकार असणाऱ्या जिल्ह्यात दूध उत्पादनातही वाढ करणे शक्य असल्याचा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे.

शक्तिस्थळे

जागतिक दर्जाची वेरुळ, अजिंठा ही पर्यटनस्थळे. शहरात बीबी का मकबरा, औरंगाबाद लेणी अशी पर्यटनस्थळे. पंचतारांकित ऑरिक सिटीमध्ये चार हजार हेक्टर, शेंद्रामध्ये दोन हजार एकर तर बिडकीन टप्पा १ मध्ये २५०० हेक्टरावर अद्ययावत सुविधा उपलब्ध. आतापर्यंत ६२०० कोटी रुपयांची गुंतवणूक त्यातून दहा हजार रोजगार. समृद्धी महामार्गामुळे उलाढालीचा वेग वाढेल.

संधी

* ऑटो क्षेत्रातील संधी, संरक्षण क्षेत्रातील क्लस्टर विकसित झाल्यास वाढतील. मका, तुती लागवडीतून रेशीम विकासास चालना मिळण्याची शक्यता.

त्रुटी

* नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये मोठी तफावत. हवाई वाहतूक क्षेत्राकडे दुर्लक्ष. सध्या मुंबई, पुणे, बेंगळुरू या शहरांना जोडणारी हवाई वाहतूक कमी.

धोके

* कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे आव्हान.

आरोग्य-शैक्षणिक गुणवत्तेकडे दुर्लक्ष

कोविडनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आरोग्य सुविधांमध्ये मोठी वाढ झाली. मात्र, शैक्षणिक गुणवत्तेकडे कमालीचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले होते. तत्कालीन विभागीय आयुक्तांनी शिक्षकांच्या पात्रतेवरच प्रश्नचिन्ह लावत त्यांची परीक्षा घ्यावी लागेल, असे निरीक्षण नोंदविले होते. शिक्षकांची परीक्षा नंतर कागदोपत्री कशीबशी झाली. पण शालेय गुणवत्ता घसरलेली आहे.