छत्रपती संभाजीनगर : अभिनय आणि नाट्य सादरीकरणात आपला झेंडा मुंबईपर्यंत रोवता यावा अशी जिगर मनात बाळगून ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत सहभागी झालेल्या प्राथमिक फेरीतील सहा संघांची निवड बुधवारी परीक्षक नितीन धंदुके आणि अमेय दक्षिणदास यांनी जाहीर केली. शेतकरी आत्महत्यांपासून ते भ्रमणध्वनींच्या अतिवापराचा मानवी मनावर होणाऱ्या परिणामांपर्यंतचे विषय हाताळत महाविद्यालयातील तरुणांनी नाट्याविष्कार सादर केले. मुलींचे प्रश्न, पुरुषी वृत्तीतून केल्या जाणाऱ्या विषयांनाही वाचा फोडणाऱ्या संहिता आणि सादरीकरणाचा उत्साह गेल्या दोन दिवसांपासून लोकांकिका स्पर्धांमधून जाणवत होता.
महाविद्यालयीन मुलांना सादरीकरणाचा सराव व्हावा, नव्या संहिता, त्याची मांडणी कशी करावी याचा अभ्यास म्हणून एकमेकांच्या एकांकिका पाहण्यापासून ते चांगल्या अभिनेते आणि अभिनेत्रींचे कौतुक केले जात होते. एका बाजूला परीक्षा आणि दुसऱ्या बाजूला एकांकिका अशी तारेवरची कसरत सहभागी संघांतील विद्यार्थ्यांनी केली. पण आपले नाटक पोहोचावे यासाठी संघ म्हणून होणारे प्रयत्नही ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेतून दिसून आले. गेल्या दोन दिवसांपासून थंडी पडलेली असतानाही नाट्यकलावंतांनी प्रवास करून सादरीकरण केले. विभागीय अंतिम फेरीसाठी सहा संघांची निवड करण्यात आली.
हेही वाचा : परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
विभागीय अंतिम फेरीसाठी निवडलेले सहा संघ
● विदूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभाग
● द लास्ट बॅटल – विद्यार्थी विकास मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
● रंगवास्तू – शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर
● शहाजी – सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय
● सन्मानीय षंडानो – पंडित गुरू पार्डीकर महाविद्यालय शिरसाळा
● फाटा – देवगिरी आर्ट्स अॅन्ड कॉमर्स व नाट्यशास्त्र विभाग
‘महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमुळे कलाकारांना नवे व्यासपीठ मिळते. मराठवाड्यातून आपल्या भागातील समस्यांकडे तरुण कसे बघतो हे कळते. तो हे सर्व विषय संवेदनशीलतेने बघतो आणि त्याचे सादरीकरण करतो आहे असे दिसते. त्याकडे नाटक म्हणून बघताना या समस्यांकडेही आता संवेदनशीलतेने बघण्याची गरज असल्याची दृष्टी हे कलाकार देत असतात.’
अमेय दक्षिणदास, परीक्षक
–
‘स्पर्धा उत्तमरीत्या पार पडल्या. वेगवेगळे विषय सादर झाले. अशा स्पर्धांमुळे महाविद्यालयीन कलाकारांना प्रोत्साहन मिळते. ग्रामीण भागातून मुलींची संख्या वाढते आहे. शिरसाळासारख्या छोट्या गावातून मुलींच्या एका संघाचे सादरीकरण झाले. अशा घटना प्रेरणा देणाऱ्या ठरतील.’
नितीन धंदुके, परीक्षक
हेही वाचा : मस्साजोगच्या सरपंचाचा अपहरणानंतर मृतदेह आढळल्याने केजमध्ये तणाव; ग्रामस्थ आक्रमक, रुग्णालय परिसरात जमाव
–
प्रायोजक
●मुख्य प्रायोजक : जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण
●सहप्रस्तुती : सॉफ्ट कॉर्नर
●सहप्रायोजक : झी टॉकीज, केसरी टूर्स, भारती विद्यापीठ
●पॉवर्ड बाय : एन एल दालमिया, फ्यूजनफ्लिक्स
●साहाय्य : अस्तित्व
●टॅलेंट पार्टनर : आयरिस प्रोडक्शन्स