छत्रपती संभाजीनगर – खासदार निधीतून कामे मिळवून देण्याचे अमिष दाखवत एका व्यक्तीला ५६ लाख रुपयांना फसवल्याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीचा प्रकार २०२१ ते १८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत पदमपुऱ्यातील मामा चौकात घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी तुषार कृष्णलाल बासनिवाल (वय ३६, रा. पदमपुरा) यांनी तक्रार दिलेली असून त्यावरून भारत राजू शेंडगे (गोकुळधाम), ज्योतिका पवार व अश्विन जाधव या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार आरोपींनी तुषार बासनीवाल यांना खासदार निधीतून कामे मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी रोख स्वरूपात ४३ लाख ९५ हजार ४५० रुपये घेतले व ऑनलाईन क्यूआर कोडद्वारे १२ लाख ४३ हजार ५४८ रुपये घेतले. या दोन्ही रकमेची मिळून ५६ लाख ३८ हजार ९९८ रुपये रुपयांची फसवणूक केली.
यासंदर्भात तुषार बासनीवाल यांनी सांगितले की, तिन्ही आरोपी कुठलाही कामधंदा करत नाहीत. त्यांच्याविषयी आणि कोणत्या खासदारांच्या निधीतील कामांविषयीचा अधिक तपशील मात्र आपण प्रचंड तणावात असल्याने देऊ शकत नाही.