छत्रपती संभाजीनगर : नक्षत्रवाडी येथील पंपहाऊसमध्ये असलेल्या नादुरुस्त व्हॉल्व्हमधून मागील आठ दिवसांपासून पाण्याची गळती सुरू आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर हा व्हॉल्व्ह असल्याने शहराच्या पाणी पुरवठ्यावर परीणाम होणार आहे. शहरातील नागरिकांना आठ दिवसांनी पाणी पुरवठा होत असताना नादुरुस्त व्हॉल्व्हमधून मात्र हजारो लीटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

व्हॉल्व्हमधून गळती होणारे पाणी पंपहाऊसलगत असलेल्या इमारतीच्या प्रवेशद्वारासमोरून वाहत आहे. त्यामुळे इमारतीतील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरात पाणी नाही, परंतु घरासमोरून पाणी वाया जात असल्याचे चित्र निर्माण झाल्याने नागरिकांनी खंत व्यक्त केली.

व्हॉल्व्ह दुरुस्त करण्यासाठी शहराचा पाणीपुरवठा आठ तासांसाठी बंद करावा लागेल, अशी माहिती पंपहाऊसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली.

पंपहाऊसमधून छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा केला जातो. व्हॉल्व्ह दुरुस्त करण्यासाठी शहराचा पाणी पुरवठा आठ तासांसाठी खंडित करावा लागेल. दुरुस्तीसाठी दोन ते तीन तासांचा कालावधी लागेल. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम हाती घेता येईल.

किरण धांडे, शाखा अभियंता, पाणीपुरवठा, जायकवाडी विभाग