छत्रपती संभाजीनगर : सिडको भागातील आझाद चौकातच असलेली १६ दुकाने गुरुवारी पहाटे ४.३० च्या सुमारास आगीच भक्ष्यस्थानी पडली. चौकातच महावितरणचे रोहित्र आहे. त्यातून निघालेल्या ठिणग्या पडून आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून, दुकाने जळालेल्या मालकांकडूनही तसा आरोप करण्यात आला आहे. त्या संदर्भाने एक तक्रारही जिन्सी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्याचे काही दुकानदारांनी सांगितले.

आगीची घटना पाहिलेल्या काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सकाळच्या सहेरच्या नमाजासाठी उठलो त्यावेळी आग बऱ्याच प्रमाणात पसरत असल्याचे निदर्शनास आले. आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन विभागाकडेही ५ वाजून ३८ मिनिटांनी प्रथम संपर्क (काॅल) केल्याचे सांगण्यात आले. अग्निशामक शेख अब्दुल वासे नासेर यांनी आझाद चौकातील दुकानांना आग लागल्याचे कळवले.

आगीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एस. के. भगत, व्ही. के. राठोड व अशाेक खांडेकर हे अधिकारी, ८ प्रमुख अग्निशमक अधिकारी, ३५ कर्मचारी, अधिकाऱ्यांचे पथक रवाना झाले. सिडको, सिडको एन-९, चिकलठाणा, पदमपुरा या चार अग्निशमन केंद्रातील चार बंब, एक गरवारेचा, वाळूज व शेंद्र आैद्योगिक वसाहत मंडळाची मिळूून तीन अशी एकूण आठ बंब व सहा ते सात पाण्याचे टँकरही मागवण्यात आले. टँकरच्या प्रत्येकी तीन फेऱ्या करून पाण्याचा मारा करण्यात आला. सुमारे पाच तासांनंतर आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आल्याचे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आग लागलेली दुकाने प्रामुख्याने लाकडी फर्निचरची अधिक असल्याने आग झपाट्याने पसरत गेली. अवघ्या काही क्षणातच आगीने रौद्ररुप घेतले होते. आग विझवल्यानंतर सर्व लाकडी साहित्याचा अक्षरश: कोळसा झालेला होता. तर छतावरील पत्रेही मुडपून गुंडाळली गेली होती.

आझाद चौकातील रोहित्रा लगतच असलेले राॅयल स्टिल व बाजूच्या अयूबभाई, सय्यद अल्ताफ, सरदारभाई, अनवर खान, वारीस देशमुख, राजीकभाई, फरीदभाई, आतिक मौलाना, सलमानभाई, वसीमभाई, सिराजभाई, अफसर पठाण, कलीमभाई, माजीदभाई, मागील बाजूचे दरवाजे तयार करणारे अजमद खान यांची दुकाने आगीत खाक झाली. राॅयल स्टिलच हे दुकान घरांमधील स्वयंपाकगृहातील कपाटे, टेबल तयार करणारे असून, तेही पूर्णपणे जळून गेले. कपाटे, टेबल तयार करणारे त्यांचे मशीनही जळाल्याची माहिती देण्यात आली. या घटनेत कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रोहित्राजवळच माजीनगरसेवक अय्यूब जहागीरदार यांचा दोन मजला बंगला असून, त्यांच्या घराच्या भिंतीही काळवंडल्या आहेत. घरावर उंच एक मनोरा असून, तेथपर्यंत आगीच्या ज्वाळा पोहोचल्या होत्या.

Story img Loader