छत्रपती संभाजीनगर : पैठण येथील सुमारे दशकभरापासून ओसाड पडलेले संत ज्ञानेश्वर उद्यान २६ जानेवारीपासून पुन्हा खुले झाले आहे. उद्यानातील आकर्षक रंगीत व संगीत कारंज्यांचे सौंदर्य पाहण्यासाठी सध्या दररोज बच्चे कंपनीसह हजार पर्यटक भेट देत आहेत. यातून पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यवसायाला संजीवनी मिळत असून, पैठणच्या अर्थकारणाचे मंदावलेले चक्र पुन्हा गतिमान होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
पैठणच्या यशवंतनगर भागात आणि नाथसागर परिसरात सुमारे ३०० एकरमध्ये संत ज्ञानेश्वर उद्यान असून, त्याच्या सौंदर्यीकरणाचे काम अजूनही सुरू आहे. यासाठी १४७ कोटी रुपये विशेष निधीचा प्रस्ताव असून, त्याअंतर्गत सौंदर्यीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यातून २७ कोटी रुपये पहिल्या टप्प्यात मंजूर झाले आहेत. २७ काेटींमधून २० कोटींची कामे आत्तापर्यंत करण्यात आली आहेत. यामध्ये २० प्रकारची कारंजे असून, त्यातील काही रंगीत आणि संगीत कारंजे आहेत. उद्यानात अंतर्गत रस्ते, वाहनतळ, मुलांसाठी खेळणी, फुलांचे ताटवे, बगीचे विकसित करण्यात आले आहेत.
उद्यान खुले होण्यामुळे येथील व्यवसायाला बळ मिळाले आहे. नाथांच्या मंदिर आणि समाधीस्थळी येणारा संप्रदायिक भाविक दर्शनानंतर पर्यटनाचाही आनंद लुटेल आणि येणारे पर्यटक दर्शन भावही जपतील. उद्यानामुळे हे दोन्ही साध्य होईल. मुलांच्या सहली वाढतील. त्यातून पैठणच्या अर्थकारणाला बळही मिळेल, असे समाधी मंदिराजवळील व्यावसायिक प्रशांत मुनकर यांनी सांगितले.
पैठणचे संत ज्ञानेश्वर उद्यान २६ जानेवारीपासून पर्यटकांना खुले करण्यात आले आहे. २७ रोजी सुटी होती. २८, २९ व ३० जानेवारी या चार दिवसांमध्ये मुले ३६२ आणि मोठे व्यक्ती ५८६, असे मिळून दररोज सरासरी एक हजारच्या संख्येने पर्यटक येत आहेत. रंगीत आणि संगीत कारंजे सुरू आहेत.
प्रशांत जाधव, कार्यकारी अभियंता.
पर्यटन व्यवसायाला गती
उद्यानामुळे हाॅटेल, उपहारगृहे, रिक्षा, खेळणीची दुकानदार, लाॅजिंग, हातमागावरील साड्या, कपडे, अशा अनेक पर्यटनावर अवलंबून व्यवसाच्या अर्थकारणाला बळ मिळेल. याच संदर्भातील इतरही व्यवसाय वाढतील. पर्यायाने रोजगारही वाढेल. दशकभरापूर्वीपासून हे थांबलेले होते. आतापर्यंत वेरुळ-अजिंठा पाहून परतणारे पर्यटक आता पैठणचाही विचार करतील.
ज्ञानेश्वर उगले, तालुकाध्यक्ष, व्यापारी महासंघ.